रस्त्यावरील खड्ड्यात वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2020 07:50 PM2020-08-20T19:50:49+5:302020-08-20T19:51:04+5:30

शिंदखेडा : रस्ता कामासाठी आंदोलन, २५ पासून उपोषण, रास्तारोको

Plantation in a roadside ditch | रस्त्यावरील खड्ड्यात वृक्षारोपण

dhule

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
शिंदखेडा : रस्त्याची दुरुस्ती होत नसल्याने माळीवाडा भागातील युवकांनी रस्त्यावरील खड्ड्यात वृक्षारोपण करुन निषेध नोंदविला. २५ आॅगस्टपर्यंत रस्ता दुरुस्ती न झाल्यास साखळी उपोषण, रास्ता रोको आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.
शिंदखेडा येथील माळीवाडा, जनता नगर, नदीपार रज्जाक नगरकडे जाणाऱ्या चिरणे रस्त्याची भगवा चौक ते नवीन बुराई नदीवरील पुलापर्यंत दुरवस्था झाली आहे. यामुळे रस्त्यावरुन पायी चालणेही मुश्कील झाले आहे. याबाबत पंचायत समितीच्या बांधकाम विभागाला अनेकवेळा सांगूनही उपयोग होत नसल्याचे या तरुणांचे म्हणणे आहे. त्यामुळे या तरुणांनी रस्त्यावरील खड्ड्यात झाडे लावून रोष व्यक्त केला. संत सावता माळी युवक संघाच्या वतीने प्रा.दीपक माळी यांनी पंचायत समितीचे प्रशासन प्रमुख विजय गिरासे यांना निवेदन दिले आहे.
शिंदखेडा शहराच्या मध्यभागातून भगवा चौकातून चिरणे रस्ता जातो. या रस्त्यावरून अर्ध्या शहराचे नागरिक धुळे चिरणे, खलाणे तसेच जनतानगर, माळीवाडा आदी ठिकाणी जाण्यासाठी मुख्य रस्ता आहे. आमदार जयकुमार रावल यांनी मंत्री असताना नुकताच बुराई नदीवर पाच कोटी रुपये खर्चून पूल बांधला आहे. मात्र, सदर रस्ता जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत येत असल्याने नगरपंचायतला दुरुस्ती करता येत नाही. यासाठी येथील युवकांनी पंचायत समितीच्या बांधकाम विभागाला कळवूनही रस्ता दुरुस्त होत नसल्याचे निवेदनात म्हटले आहे. सदर रस्त्यावर माती मिश्रीत गाळ मोठ्या प्रमाणावर असून येथे दुचाकी घसरून चालक जखमी होत आहेत. तसेच पायी चालणेही कठीण झाले आहे. ठिकठिकाणी पाण्याचे डबके साचले असून त्यातून डासांची उत्पत्ती होत असल्याने कोरोनाच्या महामारीत परिसरात साथरोग पसरण्याची शक्यता असल्याने तरुणांनी वृक्षारोपण करुन आंदोलन केले.
संबंधित रस्ता दुरुस्त न केल्यास २५ आॅगस्टपासून परिसरातील नागरिक साखळी उपोषणाला बसणार असल्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. निवेदनावर २९ नागरिकांच्या सह्या आहेत.

Web Title: Plantation in a roadside ditch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.