दुचाकी चालकाच्या हातातून पिशवी हिसकावून पोबारा; पेरेजपूर रस्त्यावरील घटना
By देवेंद्र पाठक | Published: August 25, 2023 06:35 PM2023-08-25T18:35:14+5:302023-08-25T18:35:31+5:30
सव्वा लाखाचा मुद्देमाल लंपास
धुळे : मोटारसायकलने प्रवास करणाऱ्या हस्ती बँकेचे एजंट यांच्या हातातील पिशवी बळजबरीने हिसकावून तरुणाने पोबारा केला. त्या पिशवीत रोख रकमेसह १ लाख ३५ हजारांचा ऐवज होता. ही घटना साक्रीतील पेरेजपूर रस्त्यावर गुरुवारी रात्री सव्वा नऊ वाजता ही घटना घडली. याप्रकरणी साक्री पोलिस ठाण्यात पहाटेच्यावेळी जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला.
प्रमोद पारसचंद टाटीया (वय ५६, रा. लक्ष्मीरोड, साक्री) यांनी साक्री पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार, प्रमोद टाटीया हे हस्ती को-ऑपरेटिव्ह बँकेचे एजंट म्हणून काम करतात. ते गुरुवारी रात्री सव्वा नऊ वाजेच्या सुमारास पेरेजपूर रस्त्यावरील आयडीएफसी बँकेसमोरून मोटारसायकलने जात असताना एका पांढऱ्या रंगाच्या चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यात अपघात झाल्याने प्रमोद टाटीया खाली पडले. ही संधी साधून त्याचवेळी २१ ते २२ वयोगटाच्या एका तरुणाने त्यांच्या हातातील कापडी पिशवीत ठेवलेले १ लाख १० हजार रुपये रोख आणि २५ हजार रुपये किमतीचे यंत्र असा एकूण १ लाख ३५ हजारोचा ऐवज बळजबरीने हिसकावून पोबारा करणाऱ्या अनोळखी तरुणाविरोधात जबरी चोरीचा गुन्हा साक्री पोलिस ठाण्यात नोंदविण्यात आला.