धुळ्यात आयोजित कवी संमेलनात कवितेतून दिला एकात्मतेचा संदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2018 04:18 PM2018-01-07T16:18:38+5:302018-01-07T16:20:15+5:30
राज्यस्तरीय कवी संमेलन : अंकुर संघ व कवियत्री बहिणाबाई चौधरी कवीकट्टातर्फे आयोजन
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : अंकुर साहित्य संघ व कवियत्री बहिणाबाई चौधरी कवीकट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी आयोजित पहिल्या राज्यस्तरीय कवी संमेलनात उपस्थित कवींनी स्वरचित कविता सादर करीत राष्टÑीय एकात्मतेचा संदेश दिला.
शहरातील राजवाडे संशोधन मंडळासमोरील संत अॅन्स कॅथोलिक चर्चमधील सभागृहात हा कार्यक्रम झाला. प्रारंभी संमेलनाचे उद्घाटन झाले. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक पापालाल पवार, धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेचे संचालक राजवर्धन कदमबांडे, अंकूर साहित्य संघाचे केंद्रीय अध्यक्ष अरविंद भोंडे, सचिव तुळशीराम बोबडे, विजय पाटील (नंदुरबार), भाजपाचे प्रवक्ते संजय शर्मा, ज्येष्ठ कवी श्यामकांत निकम उपस्थित होते. याप्रसंगी संजय शर्मा यांनी ‘शेतकरी व राष्टÑीय एकात्मता’ या विषयावर कविता सादर केली. तर नितीन मोघल ‘माहेरची आठवण’, रोहिदास पाटील ‘महामानव’, राजेंद्र जाधव ‘अहिराणी कुटुंब’, गुलाबराव मोरे ‘जशाच तसे’, अविनाश राठोड ‘पीक’ आदी कविता सादर करीत येथे उपस्थित रसिकांची मने जिंकली. सूत्रसंचालन राम जाधव, राजेश सोनार, अरूणा देशमुख, दत्तात्रय कल्याणकर आदी उपस्थित होते.
ग्रंथदिंडीने वेधले लक्ष
संमेलनाच्या उदघाटनापूर्वी ग्रंथदिंडी काढण्यात आली. संत अॅन्स कॅथोलिक चर्चपासून ग्रंथदिंडीला सुरुवात झाली. त्यानंतर ही ग्रंथदिंडी गुरू शिष्य स्मारकमार्गे पुन्हा चर्च परिसरात आली.
चार कवीता संग्रहाचे प्रकाशन
कार्यक्रमात कवी राम जाधव यांचा ‘आरसा’, कवी राजेश सोनार ‘चांदोबाचा दिवा’, कवी दीपक सूर्यवंशी ‘सृष्टी’, कवी सुनील बोरसे ‘मास्तर’ यांच्या कवीता संग्रहाचे प्रकाशन मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. यावेळी राजवर्धन कदमबांडे, राम भदाणे यांनी मनोगत व्यक्त केले.