महापालिकेच्या कोविड सेंटरमध्ये पोलीस अन् होमगार्डमध्ये झुंपली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2020 10:50 PM2020-08-26T22:50:31+5:302020-08-26T22:50:58+5:30
दिवसभर चर्चा : वशिलेबाजी होत असल्याचा नागरिकांचा आरोप
धुळे : शहरातील देवपूर भागात असलेल्या गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक येथील महापालिकेच्या कोविड सेंटरमध्ये बुधवारी सकाळी पोलीस आणि होमगार्ड यांच्यात चांगलीच धुमश्चक्री झाली़ दिवसभर हा विषय चर्चेचा होता़ दरम्यान, स्वॅब तपासणीच्या ठिकाणी वशिलेबाजी होत असल्याचा आरोप काही नागरिकांनी केला़
सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वॅब तपासणीसाठी देवपुरातील गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक येथील महापालिकेच्या कोविड सेंटरमध्ये गर्दी होत आहे़ सकाळपासूनच तपासणी करण्यासाठी रांगा लागलेल्या असतात़ अचानक एकाने येऊन थेट आतमध्ये प्रवेश केल्याने रांगेत उभ्या असलेल्या नागरिकांनी हरकत घेतली़ एवढ्यावरच न थांबता नागरिकांनी बंदोबस्तावर असलेल्या होमगार्डला देखील टोकले आणि कोणीही मध्ये येतच कसे याची विचारणा केली़ यावेळी आपण पोलीस असल्याचे सांगत वाद घालण्यास सुरुवात केली़ अखेरीस नागरिकांच्या विरोधामुळे या पोलिसाला माघार घ्यावी लागली असलीतरी त्याने होमगार्डशी हुज्जत घालण्याचा केलेला प्रकार चुकीचा असल्याची चर्चा या ठिकाणी होती़
तसेच रुग्णांच्या स्वॅब तपासणीत कोविड सेंटरमधील डॉक्टर आणि त्यांच्या सोबत असलेल्या स्टाफ हे वशिलेबाजी करत असल्याचा आरोप काही नागरिकांनी केला़ अनेक नागरिक सकाळपासून स्वॅब तपासणीसाठी नंबर लावून उभे राहतात़ परंतु मध्येच कोणीतरी फोनवर बोलवले जाते आणि आतमध्ये सोडले जाते़ त्यातून हा वाद उदभवल्याची चर्चा याठिकाणी सुरु होती़ होमगार्ड आणि पोलिस यांच्यात झालेल्या वादाची चर्चा होती़ मात्र, पोलिसात नोंद नाही़