गावठी पिस्तूल, काडतूससह एकाच्या मुसक्या आवळल्या
By देवेंद्र पाठक | Updated: June 23, 2024 22:13 IST2024-06-23T22:12:46+5:302024-06-23T22:13:02+5:30
चाळीसगाव रोड पोलिसांची कारवाई

गावठी पिस्तूल, काडतूससह एकाच्या मुसक्या आवळल्या
देवेंद्र पाठक, धुळे : गावठी पिस्तूल आणि ४ जिवंत काडतूससह एकाच्या मुसक्या आवळण्यात चाळीसगाव रोड पोलिसांना यश आले. ही कारवाई शनिवारी दुपारी करण्यात आली. शकील शेख सलीम ऊर्फ शकील सेंधवा (वय ४१) असे अटकेतील संशयिताचे नाव आहे. शहरातील वडजाई रोडवरील बीएसएनएल ऑफिसजवळ एक जण संशयितरीत्या फिरत असून, त्याच्याकडे शस्त्र असल्याची गोपनीय माहिती चाळीसगाव रोड पोलिसांना मिळाली.
माहिती मिळताच पथकाने धाव घेत सापळा रचून त्याला जेरबंद केले. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्याकडे २५ हजारांचा गावठी पिस्तूल, १२ हजारांचे ४ जिवंत काडतूस असा ऐवज मिळून आला. पोलिसांनी शकील शेख सलीम ऊर्फ शकील सेंधवा (वय ४१, रा. वडजाई रोड, डे स्कूलजवळ, धुळे) याला अटक केली. पोलिस कर्मचारी विनोद पाठक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शनिवारी सायंकाळी सव्वासात वाजता गुन्ह्याची नोंद करण्यात आली. पोलिस हेड कॉन्स्टेबल वाघ घटनेचा तपास करीत आहेत.