पोलिसांच्या कमांडो पथकाने गुटखा पकडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2020 08:35 PM2020-05-19T20:35:05+5:302020-05-19T20:35:53+5:30
जुन्या धुळ्यातही कारवाई : गुन्हा दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : येथील देवपूरातील एका प्रार्थनास्थळाजवळ राहणाऱ्या व्यक्तीच्या घरात छापा मारुन पोलिसांच्या कमांडो पथकाने गुटख्याचा हजारो रुपये किंमतीचा साठा पकडला़
सदर ठिकाणी प्रतिबंधीत गुटख्याचा आणि तंबाखुजन्य पदार्थांचा साठा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती़ त्यानुसार धुळे जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयातील कमांडो पथकाने अहमद रजा मोहम्मद युसूफ अन्सारी याच्या घरात छापा मारला़ घरातून हजारो रुपये किंमतीचा गुटख्याचा साठा हस्तगत केल्याची माहिती पोलिसांनी दिली़ देवपूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत ही कारवाई झाल्याने देवपूर पोलिसांनी गुटख्याचा साठा अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या ताब्यात दिला असून प्रतिबंधीत गुटखा आहे किंवा कसे तसेच त्याची किंमत याबाबतचा अभिप्राय मागविला आहे़ अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडून अहवाल आल्यानंतर गुन्हा दाखल केला जाईल, अशी माहिती देवपूर पोलिसांनी दिली़ सायंकाळी चार वाजेपर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता़
तत्पूर्वी जुने धुळे भागातील देविदास कॉलनीत १५ मे रोजी दुपारी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने छापा मारुन दोन हजार ५६० रुपये किंमतीचा प्रतिबंधीत गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांचा साठा पकडला़ कर्मचारी गोपाल विजय कासार यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन बबन पंडीत फउसे (वय ४८) यांच्याविरुध्द अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ नियम व नियमन २०११ चे कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ पुढील तपास हवालदार पाटील यांच्याकडे सोपविण्यात आला आहे़