ज्येष्ठांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस कटिबध्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2020 10:13 PM2020-01-04T22:13:00+5:302020-01-04T22:13:21+5:30
विश्वास पांढरे : पोलीस दिनानिमित्त ज्येष्ठ नागरिकांना ओळखपत्र वाटप
धुळे : ज्येष्ठ नागरिक समाजाच्या दृष्टीने फार महत्वाची असतात़ त्यांच्या सुरक्षिततेसाठी देखील पोलीस तितक्याच गांभिर्याने लक्ष देतील, असा विश्वास पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांनी व्यक्त केला़ दरम्यान, त्यांच्या हस्ते शहरातील ज्येष्ठ नागरिकांना ओळखपत्राचे वाटप करण्यात आले़
पोलीस रेझिंग सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर बसस्थानकाजवळ असलेल्या पोलीस मुख्यालयातील विविध उपयोगी हॉलमध्ये ज्येष्ठ नागरिकांची सुरक्षितता यासंदर्भात कार्यक्रम पार पडला़ यावेळी पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे बोलत होते़ त्यांच्याच हस्ते ज्येष्ठ नागरिकांना प्रातिनिधीक स्वरुपात ओळखपत्राचे वाटप करण्यात आले़
या कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न, धुळे पोलीस दलातर्फे ज्येष्ठ नागरिकांचे सुरक्षेबाबत करत असलेल्या उपाययोजना, पोलीस अधीक्षक कार्यालयातील कम्युनिटी पोलिसींग सेल अंतर्गत येणाऱ्या ज्येष्ठ नागरिक कक्षाच्या कामकाजाची माहिती देखील यावेळी देण्यात आली़ पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांनी यासंदर्भात उपस्थित असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना मार्गदर्शन केले़ या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या ज्येष्ठांना पोलीस विभागाचे ओळखपत्र देखील काही प्रमाणात प्रातिनिधीक स्वरुपात वाटप करण्यात आले़
या कार्यक्रमास अखिल भारतीय ज्येष्ठ नागरिक संघाचे सहसचिव जगदिश झाझरिया, उपाध्यक्ष भदाणे, खान्देश प्रादेशिक विभागीय ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष सोमनाथ बागड, सचिव ठाकरे यांच्यासह जिल्ह्यातील विविध ३० ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष आणि सदस्य तसेच पोलीस उपअधीक्षक (मुख्यालय) रविंद्र सोनवणे, कम्युनिटी पोलीसींग सेलचे सहायक पोलीस निरीक्षक योगेश मेहुणकर, सहायक पोलीस निरीक्षक पुनम राऊत, राखीव पोलीस निरीक्षक तडवी, राखीव पोलीस उपनिरीक्षक राठोड आणि पोलीस कर्मचारी उपस्थित होते़
दरम्यान, आवश्यक ती कागदपत्रे घेऊन पोलीस अधीक्षक कार्यालयात ज्येष्ठ नागरिकांनी ओळखपत्र घेण्यासाठी यावे असे सहायक पोलीस निरीक्षक योगेश मेहुणकर यांनी आवाहन केले़