धुळ्यात पोलीस निरीक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या, कारण अस्पष्ट
By देवेंद्र पाठक | Published: November 15, 2022 08:59 PM2022-11-15T20:59:22+5:302022-11-15T20:59:42+5:30
दोन वर्षापुर्वी तत्कालिन पोलीस निरीक्षक रमेशसिंह परदेशी यांनीही त्यांच्या शासकीय निवासस्थानी आत्महत्या केली होती.
धुळे: पोलीस प्रशिक्षण केंद्रातील पोलीस निरीक्षक विश्वनाथ कदम (५२) यांनी राहत असलेल्या ठिकाणी गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना दुपारी उशिरा घडली. आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. दरम्यान, साधारण दोन वर्षापुर्वी स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालिन पोलीस निरीक्षक रमेशसिंह परदेशी यांनीही त्यांच्या शासकीय निवासस्थानी आत्महत्या केली होती.
पोलीस प्रशिक्षण केंद्रात कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक विश्वनाथ कदम हे कार्यरत होते. पोलीस प्रशिक्षण केंद्रात दीक्षांत संचलन सोहळा २१ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आलेला आहे. त्या कार्यक्रमाची तयारी सध्या मैदानावर सुरु आहे. त्यामुळे अधिकारी, कर्मचारी त्याठिकाणी कार्यरत होते. ही संधी साधून काहीतरी कामाचे निमित्त करुन पोलीस निरीक्षक कदम हे राहत असलेल्या ब्लॉकमध्ये आले. दाराची कडी आतून लावून घेत रुमच्या लोखंडी अँगलला दोरीच्या सहाय्याने गळफास लावून घेतला.
ही घटना लक्षात येताच खळबळ उडाली. त्यांना तातडीने खाली उतरुन हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासून मयत घोषीत केले. घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्यासह वरिष्ठांनी घटनास्थळी धाव घेतली होती. शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद घेण्याचे काम सुरु होते. विश्वनाथ कदम यांना गायनासह पियानो वाजविण्याची आवड होती. शिवाय ते सर्पमित्रही होते. त्यांचा परिवार नाशिक येथे आहे. ते धुळ्यात एकटे राहत होते. त्यांनी आत्महत्या का आणि कशासाठी केली याचे कारण समजू शकलेले नाही. पोलीस तपास सुरु आहे.