धुळे : गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक रमेशसिंह परदेशी यांची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2018 08:43 AM2018-02-01T08:43:31+5:302018-02-01T10:31:34+5:30
धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेशसिंह परदेशी यांनी राहत्या घरी आत्महत्या केल्यानं खळबळ उडाली आहे.
धुळे : धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेशसिंह परदेशी यांनी राहत्या घरी आत्महत्या केल्यानं खळबळ उडाली आहे. आपल्या पिस्तुलातून स्वतःवर गोळी झाडून त्यांनी आत्महत्या केली आहे. बुधवारी रात्री उशिरा 1.30 वाजण्याच्या सुमारास त्यांनी आत्महत्या केली आहे. ज्यावेळी त्यांनी स्वतःचं आयुष्य संपवलं त्यावेळी त्यांच्या पत्नीदेखील घरातच होत्या. या घटनेने जिल्ह्याच्या पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.
गोळीबाराचा आवाज ऐकून शेजारी राहणारे पोलीस निरीक्षक सपकाळे त्यांच्या घरी धावून गेले. घटनेबाबतची माहिती त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक रामकुमार, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विवेक पानसरे व अन्य अधिकारी घटना स्थळी पोहोचले. परदेशी यांच्या आत्महत्येच्या घटनेमुळे जिल्ह्याच्या पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. परदेशी यांनी कुख्यात गुंड गुड्डया हत्या प्रकरणातील आरोपींना पकडण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजाविली होती. परदेशी हे मूळचे नाशिक जिल्ह्यातील रहिवासी होते. त्यांच्या सेवानिवृतीला चार महिने उरलेले असताना त्यांच्या आत्महत्या करण्यामागील नेमके कारण अद्याप समजलेले नाही.
बुधवारी संध्याकाळी नाशिक येथील काम आटपून परदेशी धुळ्यामध्ये परतले होते. त्यांनी रात्री आपल्या सहका-यांना संपर्क साधत पांझरा नदी काठावरील निर्माण झालेले वाद मिटवण्याच्या सूचनाही दिल्या. यावेळी थोड्याच वेळेत तेथे येतो, असेही त्यांनी सांगितले. पण रात्री दीड वाजण्याच्या सुमारास त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली.
दरम्यान, नाशिक येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांचे पार्थिव नाशिकला घेऊन जाण्यासाठी परदेशी यांचा मुलगा व अन्य नातेवाईक धुळ्यात पोहोचले आहेत.
Maharashtra: A police inspector of local crime investigation department in Dhule allegedly committed suicide by shooting himself with his pistol at his residence in the early morning hours; Investigation on
— ANI (@ANI) February 1, 2018