महाळपूर हातभट्टीवर पोलिसांची धाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 09:47 PM2018-08-29T21:47:26+5:302018-08-29T21:48:30+5:30
जिल्ह्यात ठिकठिकाणी दारु जप्त : मुद्देमालाची जागेवरच विल्हेवाट, संशयित जेरबंद
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे/शिंदखेडा : शिंदखेडा तालुका पोलीस स्टेशनअंतर्गत चिमठाणे औटपोस्टच्या कर्मचाºयांनी त्यांच्या हद्दीतील महाळपुर व निशाणे शिवारात बुराई नदी काठावरील कपाशीच्या शेतालगत मोठ्या प्रमाणात हातभट्टीची दारू तयार होत असल्याची माहिती एका महिलेने पोलिसांना दिली़ माहिती मिळताच पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकून सुमारे ८५ हजाराची दारुसह अनुषंगिक साहित्य व प्लास्टिकचे मोठे ३० ड्रम असा मुद्देमालासह रसायन नष्ट केले़ आत्तापर्यंतची पोलिसांची सर्वात मोठी कारवाई असल्याचे बोलले जात आहे़
शिंदखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भरत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली चिमठाणे दुरक्षेत्रचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश चव्हाण यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक वसंत पाटील, पोलीस कर्मचारी भटू चौधरी, अविनाश लोखंडे, प्रकाश माळी यांच्या पथकाने महाराष्ट्र दारुबंदी महीला मोर्चाच्या गितांजली कोळी यांच्या सोबत बुधवारी दुपारी बुराई नदी काठी शेतात ही कारवाई केली़ शिंदखेडा तालुक्यातील महाळपूर व निशाणे हद्दीतील नदीकाठी असलेल्या शेतात छापा टाकून सुमारे ८५ हजाराचे रसायनाचा साठा, प्लॅस्टिकच्या ३० ड्रममध्ये ठेवण्यात आलेला गुळ आणि नवसागर याचे रसायन भरले होते़ हा मुद्देमाल यावेळी नष्ट करण्यात आला़ मात्र, यावेळी घटनास्थळी कोणीही आढळून न आल्याने गुन्हा दाखल झालेला नाही़ एवढ्या मोठ्या प्रमाणात अवैध गावठी दारु नष्ट करण्यात आल्याने निशाणे व महाळपूर गावातील महिला व ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले़
शहरासह जिल्ह्यात पोलिसांच्या पथकाने छापा टाकत हातभट्टीची दारु जप्त करत तिची विल्हेवाट लावली आहे़ याप्रकरणी ६ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे़ दरम्यान, जप्त केलेल्या दारुची ४ हजार ८३० किंमत आहे़
जिल्ह्यातही दारु जप्त
साक्री तालुक्यातील गव्हाणीपाडा येथे गावठी हातभट्टीची दारु बेकायदेशिरपणे चोरटी विक्री करताना रविंद्र नामदेव सोनवणे (२२) या संशयिताला पकडण्यात आले़ त्याच्याकडून ४१० रुपये किंमतीची १० लिटर गावठी दारु जप्त करण्यात आली़ याप्रकरणी पोलीस कर्मचारी मनोज अशोक बैसाणे यांनी पिंपळनेर पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली आहे़
साक्री तालुक्यातील पानखेडा येथे गावठी हातभट्टीची दारु बेकायदेशिरपणे चोरटी विक्री करताना हिरामण हिंमत सोनवणे (६२) या संशयिताला पकडण्यात आले़ त्याच्याकडून ३६० रुपये किंमतीची ८ लिटर गावठी दारु जप्त करण्यात आली़ याप्रकरणी पोलीस कर्मचारी प्रशांत अशोक शिंपी यांनी पिंपळनेर पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली आहे़
धुळे तालुक्यातील मोराणे गावातील भिलाटीत गावठी हातभट्टीची दारु बेकायदेशिरपणे चोरटी विक्री करताना ३८ वर्षीय संजय नामक तरुण संशयिताला पकडण्यात आले़ त्याच्याकडून १ हजार ५० रुपये किंमतीची २५ लिटर गावठी दारु जप्त करण्यात आली़ याप्रकरणी पोलीस कर्मचारी उमेश गावित यांनी धुळे तालुका पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली आहे़
शिंदखेडा तालुक्यातील मुडावद येथे पांढºया रंगाची ताडी बेकायदेशिरपणे चोरटी विक्री करताना कलाबाई पिरन शिरसाठ (५०) या संशयित महिलेला पकडण्यात आले़ तिच्याकडून ५१० रुपये किंमतीची २० लिटर पांढºया रंगाची ताडी जप्त करण्यात आली़ याप्रकरणी पोलीस कर्मचारी सचिन वसंत वाघ यांनी शिंदखेडा पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली आहे़
साक्री तालुक्यातील सातआंबा येथे गावठी हातभट्टीची दारु बेकायदेशिरपणे चोरटी विक्री करताना हिराजी पुन्या मालचे (४५) या संशयिताला पकडण्यात आले़ त्याच्याकडून ६०० रुपये किंमतीची एक प्लॅस्टिकची कॅन गावठी दारु जप्त करण्यात आली़ याप्रकरणी पोलीस कर्मचारी शरद एकनाथ चौरे यांनी पिंपळनेर पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली आहे़
धुळे शहरातील मालेगाव रोडलगत काटेरी झुडूपात गावठी हातभट्टीची दारु बेकायदेशिरपणे चोरटी विक्री करताना श्याम रामचंद्र दिघे (६०) या संशयिताला पकडण्यात आले़ त्याच्याकडून २ हजार रुपये किंमतीची २५ लिटर गावठी दारु जप्त करण्यात आली़ याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे मयूर पाटील यांनी धुळे शहर पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली आहे़