व्हॅनमध्ये काय? दिली उडवाउडवीची उत्तरं, पोलिसांचा छापा; चार गुरांची सुटका, लाखाचा ऐवज जप्त
By देवेंद्र पाठक | Published: December 10, 2023 07:06 PM2023-12-10T19:06:43+5:302023-12-10T19:09:24+5:30
या गुरांसह १ लाख ३० हजार रुपये किमतीचे वाहन असा एकूण १ लाख ५१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
धुळे : पिकअप वाहनाच्या माध्यमातून केली जाणारी गुरांची तस्करी पोलिसांनी नरडाणा गावाजवळ पकडली. यात गुरांची सुटका करण्यात आली असून दीड लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई शनिवारी रात्री पावणे आठ वाजता करण्यात आली. याप्रकरणी रात्री दोन जणांविरोधात नरडाणा पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली.
मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा गावाजवळून एक पिकअप व्हॅन जाणार आहे, त्यातून गुरे नेली जाणार असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक सचिन बेंद्रे यांना मिळाली. माहिती मिळताच नरडाणानजिक हॉटेल बाबाजी समोर पोलिसांनी सापळा लावला होता. शनिवारी सायंकाळी पावणे आठ वाजेच्या सुमारास एमएच २८ बीबी १९८७ क्रमांकाची पिकअप व्हॅन येताच ती अडविण्यात आली. व्हॅनमध्ये काय आहे अशी चौकशी केली असता चालकाने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याला ताब्यात घेऊन तपासणी केली असता २१ हजार रुपये किमतीची ४ गुरे आढळून आली. या गुरांसह १ लाख ३० हजार रुपये किमतीचे वाहन असा एकूण १ लाख ५१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याप्रकरणी पोलिस कर्मचारी विनोद कोळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दीपक नारायण पडाळे (वय २५, रा. दोंडखेडा जि. जालना) आणि अजय वसंता आराक (वय २६, रा. डिग्रस जि. छत्रपती संभाजीनगर) या दोघांना अटक करण्यात आली. विविध कलमान्वये गुन्ह्याची नोंद शनिवारी रात्री सव्वा नऊ वाजेच्या सुमारास करण्यात आली. पोलिस नाईक बी. ई. पाटील घटनेचा तपास करीत आहेत.