शोधायला गेले शस्त्रसाठा मिळाले चॉकलेट
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2018 08:55 AM2018-06-28T08:55:59+5:302018-06-28T08:56:03+5:30
मुंबई-आग्रा महामार्गावरुन बुधवारी दिल्लीकडे एक कंटेनर जाणार असून त्यात अवैध शस्त्रसाठा असल्याची गुप्त माहिती जिल्हा पोलिसांना मिळाली होती.
धुळे - मुंबई-आग्रा महामार्गावरुन अवैध शस्त्रसाठा घेऊन जाणारा कंटेनर जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसाच्या पथकाने ट्रॅप लावून एक कंटेनर पकडला देखील, पण त्यात चक्क चॉकलेट निघाले. विचारपूस केल्यानंतर कंटेनर सोडून देण्यात आले. मुंबई - आग्रा महामार्गावरुन बुधवारी दिल्लीकडे एक कंटेनर जाणार असून त्यात अवैध शस्त्रसाठा असल्याची गुप्त माहिती जिल्हा पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलीस यंत्रणा अलर्ट झाली. शहरातील मुंबई - आग्रा महामार्गावर सापळा रचून पोलिसांनी सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास पारोळा रोड चौफुलीवर टी.एन.१८ सी ४४०३ क्रमांकाचा कंटेनर पकडला.
कंटेनर चालक जुगनू चौधरी आणि अर्जुन चौधरी दोन्ही बुलंद शहर उत्तर प्रदेश यांना कंटेनरसह चौकशीसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात आणण्यात आले. त्याची चौकशी केली असता त्यांनी कंटेनरमध्ये चॉकलेट असल्याचे सांगितले. पोलिसांनी कंटेनरचे सील तोडून आतमध्ये तपासणी केली. कंटेनरमध्ये चॉकलेटच निघाले. शेवटी तब्बल दीड ते दोन तास चौकशी केल्यानंतर कंटेनर व चालकाला सोडण्यात आले. ते पुन्हा दिल्लीकडे मार्गस्थ झाले. यासर्व कारवाईत पोलिसांची मात्र खूप दमछाक झाली. मात्र, काही न निघाल्याने पोलीस अधिकारी रिलॅक्स झाले आणि सुटकेचा श्वासही घेतला.