पोलीस असल्याचे सांगून धुळ्यात वृद्धाला दोघांनी लुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2018 03:12 PM2018-05-06T15:12:01+5:302018-05-06T15:12:01+5:30
५० हजाराचे दागिने घेऊन चोरट्यांचा पोबारा
आॅनलाइन लोकमत
धुळे : पोलीस असल्याचे सांगून, सोन्याचे दागिने आमच्याकडे द्या आम्ही सुरक्षित ठेवतो असे सांगून ७४ वर्षीय वृद्धाकडील ५० हजार रूपये किंमतीचे दागिने लंपास केल्याची घटना ५ रोजी सकाळी ८.१५ वाजेच्या सुमारास देवपूर एनसीसी कार्यालयासमोरील रस्त्यावर घडली. याप्रकरणी देवपूर पोलीस स्टेशनला दोन अज्ञातांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
शहरातील मंगलमूर्ती कॉलनीत राहणारे सेवानिवृत्त कर्मचारी भटू हरी सोनार (७४) हे ५ मे रोजी सकाळी मोटारसायलने (क्र. एमएच १८- एएम ७१७४) दूध घेऊन घरी जात होते. देवपुरातील एनसीसी कार्यालयासमोरील सार्वजनिक रोडवर दोन अज्ञातांनी त्यांना थांबवित, आम्ही पोलीस आहोत असे सांगून त्यांचे कार्ड दाखविले. त्यांनी सोन्याचे दागिने आमच्याकडे द्या आम्ही सुरक्षित ठेवतो असे सांगितले. त्यानुसार भटू सोनार यांनी २० हजार रूपये किंमतीची १० ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, १० हजार रूपये किंमतीची ७ ग्रॅमची अंगठी, तसेच २० हजार रूपये किंमतीची १५ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन काढून त्या दोघांजवळ दिली. दागिने मिळाल्यानंतर ते रूमालात ठेवत तुमच्या दुधाच्या पिशवीत ठेवतो असे त्यांनी सांगितले. मात्र दागिने पिशवीत न ठेवता त्या अज्ञात चोरट्यांनी पोबारा केला. या सर्व दागिन्यांची किंमत ५० हजार रूपये एवढी आहे.
याप्रकरणी भटू सोनार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून देवपूर पोलीस स्टेशनला दोन अज्ञात चोरट्यांविरूद्ध भादवि कलम १७०, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक ए.आर. पटेल करीत आहेत.