धुळ्यात ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2018 07:23 PM2018-02-18T19:23:02+5:302018-02-18T19:24:25+5:30
शिवजयंती उत्सव : १ हजार ४०० कर्मचारी
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : शिवजयंतीनिमित्त शहरात होणारे विविध कार्यक्रम शांततेत होण्यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात येणार आहे़ पोलीस अधीक्षक एम़ रामकुमार यांचे लक्ष राहणार आहे़
शांतता कमिटीची बैठक
सोमवारी साजरी होणाºया शिवजयंतीचे औचित्य साधून शहर वाहतूक शाखेच्या शेजारी असलेल्या हॉलमध्ये शांतता समितीची बैठक घेण्यात आली होती़ त्यात डीजे वाद्याला बंदी असल्याने कोणीही त्याचा आग्रह करु नये़ अनधिकृत विषयाबाबत परवानगी कोणीही मागू नये़ सर्वांनी कायद्याचे पालन करत शांततेत उत्सव साजरा करावा़ कोणत्याही प्रकारचा गालबोट लागणार नाही, याची कटाक्षाने काळजी घ्यावी़ वेळेचे बंधन सर्वांनी पाळणे गरजेचे राहिल़ कायद्याची चौकट कोणीही ओलांडू नये अशाही सूचना करत कायद्याचे पालन केल्यास पोलिसांकडून सहकार्य मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला होता़
पोलिसांचा तगडा बंदोबस्त
शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रम आणि सायंकाळी निघणारी मिरवणूक शांततेत पार पडावी यासाठी पोलीस प्रशासनाने नियोजन केले आहे़ त्यानुसार बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे़ पोलीस अधीक्षक एम़ रामकुमार, अपर पोलीस अधीक्षक विवेक पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील ४ उपविभागीय पोलीस अधिकारी, १२ पोलीस निरीक्षक, ५५ सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक, १ हजार ४०० पोलीस कर्मचारी, ४०० पुरुष होमगार्ड, १०० महिला होमगार्ड आणि एसआरपीएफच्या दोन कंपन्या याप्रमाणे तगडा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे़
मिरवणुकीवर एलसीबीचा ‘वॉच’
शहरातील ज्या ज्या मार्गावरुन शिवजयंतीची शोभायात्रा, दुचाकी रॅली यासह लहान - मोठे कार्यक्रम होणार आहेत त्या सर्वांवर बारकाईने लक्ष केंद्रीत केले जाणार आहे़ स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर विशेष जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे़ तशा प्रकारचे आदेश देखील त्यांना देण्यात आल्यामुळे त्यांच्या स्तरावर स्वतंत्र नियोजन आखण्यात येत आहे़
पोलिसांची साप्ताहीक सुटी रद्द
शिवजयंती शांततेत पार पडावी आणि पोलिसांच्या बंदोबस्तात कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये यासाठी पोलीस अधीक्षक एम़ रामकुमार यांच्या सुचनेवरुन सोमवारी पोलिसांची साप्ताहीक सुटी रद्द करण्यात आली आहे़ परिणामी पोलिसांना कर्तव्य बजवावे लागेल़