पोलिस कर्मचाऱ्याचा मुलगा सापडला जबरी चोरीच्या गुन्ह्यात

By देवेंद्र पाठक | Published: June 26, 2023 11:21 PM2023-06-26T23:21:57+5:302023-06-26T23:22:14+5:30

सोनपोत ओरबाडून केला पोबारा; लाखाचा होता मुद्देमाल

Policeman's son was found in the crime of forced theft | पोलिस कर्मचाऱ्याचा मुलगा सापडला जबरी चोरीच्या गुन्ह्यात

पोलिस कर्मचाऱ्याचा मुलगा सापडला जबरी चोरीच्या गुन्ह्यात

googlenewsNext

धुळे : रात्रीच्या वेळेस फिरत असताना नाशिक येथील भाऊ-बहीण यांना थांबवून दोघांच्या गळ्यातील सोनपोत ओरबाडून पोबारा करणाऱ्या तिघांना शहर पोलिसांनी पकडले. संशयितांपैकी एक हा राज्य राखीव दलातील पोलिस कर्मचाऱ्याचा मुलगा असल्याचे समोर आले. ही घटना शनिवारी (दि. २४) रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास रेल्वे रोड भागात घडली होती.

नाशिक येथील गांधी नगरात राहणारी प्रियंका राजेंद्र पवार (२६) हिने शहर पोलिस ठाण्यात रविवारी सायंकाळी ७ वाजता फिर्याद दाखल केली होती. प्रियंका पवार ही आपल्या भावासोबत धुळ्यात त्यांच्या काकांकडे आलेले हाेते. जेवण झाल्यानंतर भाऊ-बहीण हे फिरण्यासाठी निघाले. रेल्वे रोड भागातील अनाई दूध डेअरीजवळ ते आले असता तीनजणांनी त्यांना अडविले. आमच्याकडे बघून टाळी वाजविल्याच्या कारणावरून काही कारण नसताना हुज्जत घातली. त्यांना शिवीगाळ करत हाताबुक्क्याने मारहाण केली.

एवढ्यावरच न थांबता त्यांनी एकाच्या गळ्यातील ४५ हजार रुपये किमतीची १५ ग्रॅम वजनाची चेन, तर दुसऱ्याच्या गळ्यातील ६० हजार रुपये किमतीची २० ग्रॅम वजनाची चेन असा एकूण एक लाख पाच हजार रुपये किमतीचा ऐवज लुटून पोबारा केला. याप्रकरणी रविवारी सायंकाळी ७ वाजता शहर पोलिस ठाण्यात भादंवि कलम ३९४, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली.

गुन्हा दाखल होताच सीसीटीव्ही फुटेज आणि सांगितलेल्या वर्णनानुसार तीनजणांना ताब्यात घेण्यात आले. अमित संजय गावडे (२२, रा. सहजीवननगर, धुळे), किरण भगवान मराठे (२३, रा. समतानगर, धुळे) आणि अक्षय राजेंद्र गावडे (२५, रा. ५०० क्वॉर्टर, एसआरपीएफ, सुरत बायपास, धुळे) या तिघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून मुद्देमालही जप्त करण्यात आला. घटनेचा तपास पोलिस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक दीपक धनवटे करीत आहेत.

Web Title: Policeman's son was found in the crime of forced theft

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.