तंत्रनिकेतन बंद होणार नाही!
By admin | Published: February 12, 2017 12:48 AM2017-02-12T00:48:42+5:302017-02-12T00:48:42+5:30
तंत्रशिक्षण सचिवांचे आश्वासन : प्रा.शरद पाटील यांची माहिती
धुळे : शहरातील देवपूर येथील शासकीय तंत्रनिकेतन बंद होणार नाही. नव्याने श्रेणीवर्धित होऊन स्थापन करण्यात येणारे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय हे जुन्या शासकीय तंत्रनिकेतन या संस्थेला जोडूनच सुरू करण्यात येईल, असे स्पष्ट आश्वासन राज्याचे तंत्र व उच्च शिक्षण सचिव सीताराम कुंटे यांनी दिले आहे, अशी माहिती शिवसेनेचे माजी आमदार प्रा.शरद पाटील दिली.
प्रा.शरद पाटील यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने १३ आॅक्टोबर २०१६ रोजीच्या शासन निर्णयान्वये राज्यातील सहा शासकीय तंत्रनिकेतन बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. यामध्ये धुळ्याचाही समावेश होता. या निर्णयामुळे जिल्ह्यात शिक्षण क्षेत्रात संतापाची लाट पसरली होती. धुळे जिल्ह्यातील शासकीय तंत्रनिकेतन ६२ वर्ष जुनी संस्था असून या संस्थेकडे परिपूर्ण इमारतींसह सहा शाखांकरिता आवश्यक तेवढा तज्ज्ञ शिक्षक, कर्मचारीवर्ग उपलब्ध आहे. नवीन पदवी अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करावयाचे झाल्यास या संस्थेकडे ५८ एकर एवढी जागा उपलब्ध आहे. यामध्ये हे महाविद्यालय सुरू करण्याची मागणी केली.
जळगाव येथे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय हे शासकीय तंत्रनिकेतनला जोडून आहे. त्यामुळे धुळे जिल्ह्यात जुने शासकीय तंत्रनिकेतन बंद करू नये. या शासकीय तंत्रनिकेतनमध्ये अनुसूचित जाती-जमातीचे विद्यार्थी नाममात्र १ हजार ६०० रुपयात शिक्षण घेतात. तर खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ६००० रुपयामध्ये प्रवेश मिळतो. खासगी संस्थांमध्ये मात्र डोनेशन म्हणून लाखो रुपये घेतले जातात. त्यामुळेच या संस्थेत गरीब कुटुंबातील विद्यार्थी पदविका शिक्षण घेण्यासाठी येत असतात, अशी तंत्रनिकेतन संदर्भातील बाजूही त्यांनी निवेदनाच्या माध्यमातून मांडली.
शासकीय तंत्रनिकेतन बंद करण्याचा निर्णय आल्यानंतर जिल्ह्यातील विद्यार्थी व पालकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
यानंतर सदर शासकीय निर्णय प्रलंबित असतानाच तंत्रशिक्षण विभागाच्या नवीन फतव्यामुळे पुन्हा संतापाची लाट पसरली आहे. विविध विद्यार्थी संघटनांनी आंदोलने सुरू केली आहेत. यामध्ये युवासेना, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, शिवसेना आदींनी आपल्यापरीने आंदोलने सुरू केली आहेत.
या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रा.शरद पाटील यांनी ३० जानेवारी रोजी जिल्हाधिकाºयांना निवेदन दिले होते. यानंतर नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल, तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे, मंत्री जयकुमार रावल, पालकमंत्री दादा भुसे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, धनंजय मुंढे, तंत्रशिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर, तंत्रशिक्षण संचालक एस.के.महाजन, तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव सीताराम कुंटे यांना निवेदन सादर केली.
या पाठपुराव्याला यश आले असल्याचे प्रा.शरद पाटील यांचे म्हणणे आहे.