हेंद्रुण-मोहाडी रस्त्याची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2020 10:53 PM2020-08-26T22:53:27+5:302020-08-26T22:53:39+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क वडजाई : धुळे तालुक्यातील हेंद्रुण ते मोहाडी रस्त्यांची पार दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले ...
लोकमत न्यूज नेटवर्क
वडजाई : धुळे तालुक्यातील हेंद्रुण ते मोहाडी रस्त्यांची पार दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून त्यात पावसाचे पाणी साचले आहे. या रस्त्यावरुन पायी चालणेही कठीण झाले आहे. चालकांना अक्षरश: कसरत करावी लागत आहे. या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी हेंद्रुण, मोघण, तिखी, रानमळा येथील ग्रामस्थांंनी केली आहे.
धुळे तालुक्यातील हेंद्रुण, मोघण, तिखी, रानमळा आदी गावातील ग्रामस्थांना धुळे येथे जाण्यासाठी मोहाडीकडुन येण्यासाठी हा एकमेव मुख्य रस्ता आहे. गावातील हजारो तरुण उदरनिर्वाहासाठी धुळे येथील एम.आय.डी.सी. येथे कामासाठी येतात. तसेच याच रस्त्याला डेडरगाव येथे जलशुध्दीकरण केंद्र आहे. महापालिकेने या परिसराला पर्यटनस्थळ घोषित केले आहे. याच रस्त्यावर विपश्यना ध्यान साधना केंद्र आहे. या केंद्रात भारतासह विदेशातून नागरिक ध्यानसाधना शिकण्यासाठी येतात. रस्ता खराब असल्याने या मार्गावर येण्यासाठी रिक्षावाले नाखुश असतात. मोहाडी ते हेंद्रुण गावापर्यंतच्या रस्त्याची पार दुरावस्था झाली आहे. तीन ते चार फुटाचे मोठमोठे खड्डे मध्यभागी पडले आहेत. या रस्त्यावर मोटारसायकलसह चारचाकी वाहन चालवणे जिकिरीचे झाले आहे. अनेकदा खड्डा चुकविण्याच्या नादात अपघात घडतात. खड्ड्यात मोठया प्रमाणात पाणी साचत असल्यामुळे व चिखल झाल्यामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. सदर रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.