धुळे जिल्ह्यातील खरीप आढावा बैठक लांबणीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2019 12:08 PM2019-04-19T12:08:32+5:302019-04-19T12:10:16+5:30
मतदान झाल्यानंतर बैठक होण्याची शक्यता
आॅनलाइन लोकमत
धुळे : खरीप हंगामाची रूपरेषा ठरविण्यासाठी दरवर्षी एप्रिल महिन्यातच जिल्हास्तरीय खरीप आढावा बैठक होत असते. मात्र यावर्षी निवडणुका असल्याने, खरीप आढावा बैठक लांबलेली आहे. त्यामुळे खरीप हंगामाच्या नियोजनासाठी मे महिना उजाडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
दरवर्षी एप्रिल महिन्यात खरीप आढावा बैठक पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत होत असते. या बैठकीत राष्टÑीयकृत, खाजगी बॅँकानी वितरीत केलेल्या कर्जाचा तपशील, बॅँकानी कर्ज वितरणासाठी निश्चित केलेले लक्षांक,खरीप हंगामासाठी लागणारे रासायनिक खते, बियाणे, किती हेक्टर क्षेत्रावर लागवडीचे उद्दिष्ट ठरविण्यात आलेले आहे, याची आकडेवारी सादर करण्यात येत असते. त्याचबरोबर पंतप्रधान पीक विमा योजना, हवामान आधारित पथदर्शक पीक विमाग योजना, रोजगार हमी योजनेशी निगडीत फळबाग लागवड कार्यक्रम, राष्टÑीय फलोत्पादन अभियान, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, शासकीय दूध योजना आदींविषयी माहिती देवून त्याचे नियोजन करण्यात येत असते.
एप्रिल महिन्यातच ही बैठक होत असल्याने, नियोजन करणे फायदेशीर ठरत असते. मात्र यावर्षी एप्रिल महिन्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागून असल्याने, त्याचबरोबर सर्वच शासकीय कर्मचारी निवडणूक कामात व्यस्त असल्याने खरीप आढावा बैठक अद्याप होऊ शकलेली नाही. धुळे लोकसभा मतदार संघात २९ रोजी मतदान आहे. तोपर्यंत ही बैठक होणे शक्य नाही. त्याचबरोबर २३ मे रोजी मतमोजणी आहे. या दरम्यान खरीप आढावा बैठक होईल असा अंदाज वर्तविला जात आहे.