चारही तालुक्यात आबादानी, नजर पैसेवारी ५० पैशांपेक्षा जास्तच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2020 12:12 PM2020-10-07T12:12:11+5:302020-10-07T12:12:32+5:30
धुळे जिल्हा : प्रशासनाकडून २०२०-२१ खरीप हंगामाची नजर पैसेवारी जाहीर
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : २०२०-२१ खरीप हंगामाची नजर पैसेवारी जाहीर झालेली असून, धुळे जिल्ह्यातील चारही तालुक्यांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा जास्त जाहीर करण्यात आलेली आहे. त्यामुळे आता अंतिम पैसेवारीकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिलेले आहे.
यावर्षी आॅगस्टच्या मध्यापर्यंत पिकांची स्थिती चांगली होती. कोरोच्या काळात झालेले नुकसान खरीप हंगामात भरून निघेल अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती. मात्र आॅगस्टच्या शेवटच्या आठवड्यात तसेच सप्टेंबर महिन्याचे सुरवातीच्या दोन आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप हंगामाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
अशा स्थितीत शेतकºयांच्या नजरा प्रशासनाकडून जाहीर होणाºया नजर पैसेवारीकडे लागले होते. ५० पैशांच्या आत पैसेवारी लागू झाल्यास शासनाच्या सवलती लागू होत असतात. मात्र प्रशासनातर्फे नुकतीच जाहीर करण्यात आलेली जिल्ह्यातील चारही तालुक्यांची नजर पैसेवारी ५० पैशांपेक्षा जास्त आहे.
धुळे तालुक्यातील १६८ गावांची पैसेवारी ग्रामीणचे तहसीलदार किशोर कदम यांनी जाहीर केली. तालुक्याची पैसेवारी ५० पैशांपेक्षा जास्त आहे. साक्री तालुक्यातील १६९ ग्रामपंचायतींची तसेच शिरपूर तालुक्यातील ११९ गावांची तसेच शिंदकेडा तालुक्यातील सर्व गावांची नजर पैसेवारी ५० पैशांपेक्षा जास्त जाहीर करण्यात आलेली आहे.
ही प्राथमिक पैसेवारी असून, आता अंतिम पैसेवारी जाहीर होण्याकडे शेतकºयांचे लक्ष लागून राहिलेले आहे.