वीज कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:39 AM2021-05-25T04:39:55+5:302021-05-25T04:39:55+5:30
वारूड : वीज कर्मचारी अभियंता, अधिकारी यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी सोमवारपासून संपूर्ण महाराष्ट्रात कामबंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला असल्याची ...
वारूड : वीज कर्मचारी अभियंता, अधिकारी यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी सोमवारपासून संपूर्ण महाराष्ट्रात कामबंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती वीज कर्मचारी कामगार, अभियंते कर्मचारी संघटना या संयुक्त कृती समितीमार्फत देण्यात आली आहे. वीज कामगार, अभियंते, अधिकारी व कंत्राटी कामगारांना फ्रंटलाईन वर्करचा दर्जा दिलेला नाही. तसेच प्राधान्याने लसीकरण नसल्यामुळे शेकडो वीज कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे व आज हजारो वीज कर्मचारी बाधित झाले आहेत. मात्र, असे असतानाही वीजबिल वसुली मोहीम राबविण्यासाठी दबावतंत्र वापरले जात आहे. या पार्श्वभूमीवर सोमवार, दिनांक २४पासून बेमुदत कामबंद आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या आंदोलन काळात हॉस्पिटलसह केवळ अत्यावश्यक सेवांचा वीजपुरवठा निरंतर सुरळीत ठेवण्याचे काम केले जाईल, इतर कोणतीही कामे करण्यात येणार नाहीत, असा इशारा दिलेला आहे. वीज कर्मचारी, अभियंता, अधिकारी यांना फ्रंटलाईन वर्करचा दर्जा देऊन शासनाप्रमाणे सुविधा मिळाव्यात, वीज कर्मचारी, अधिकाऱ्यांसह त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे प्राधान्यक्रमाने लसीकरण व्हावे, कोरोनामुळे मृत्यू झालेले कर्मचारी व अधिकाऱ्यांना पन्नास लाख रुपये एवढे अनुदान द्यावे, तीनही कंपन्यांकरिता एमडी इंडिया या जुन्याच टीपीएची तत्काळ नेमणूक करावी, महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक पाहता वीजबिल वसुली करता सक्ती करू नये, अशा विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे. या अनुषंगाने सर्व कर्मचारी, अधिकारी, अभियंते यांनी सोमवारी काळ्या फिती लावून कामबंद आंदोलन करून निषेध व्यक्त केला. इंजिनिअर्स असोसिएशनतर्फे गणेश अस्मर, हेमेंद्र जगनीया, हेमंत अहिरे, जितेंद्र सोनजे, किर्तेश जोशी, वीज कामगार महासंघातर्फे दिगंबर भदाने, सर्कल सचिव धुळे देवेंद्र पाटील, जी. ए. घोडके, एस. वाय. ठाकूर, संकेत वाकडे, महेंद्र पाटील, सुयोग जैन, भूषण चौधरी, कुलदीप शिरसाठ, यु. व्ही. बाविस्कर, अनिल शेटे, सजन पावरा, दिलीप पावरा, विशाल पाटील, जनाबाई पाटील तसेच महाराष्ट्र स्टेटतर्फे योगेश तावडे, बी. एफ. नुकते, आदी कर्मचारी या कामबंद आंदोलनात सहभागी झाले होते.