धर्मा पाटील यांच्या जमिनीचा वस्तुनिष्ठ अहवाल तयार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2018 05:48 PM2018-02-05T17:48:43+5:302018-02-05T17:49:36+5:30
विखरण : वाढीव मोबदल्यासाठी तीन दिवसात दुसरा अहवाल देणार
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : शिंदखेडा तालुक्यातील विखरण येथील धर्मा पाटील यांच्या जमीन संपादनाचा वस्तुनिष्ठ अहवाल तयार करण्यात आला आहे. परंतु, या अहवालावर सोमवारी सायंकाळी उशिरापर्यंत जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांची स्वाक्षरी न झाल्याने हा अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या अहवालावर स्वाक्षरी न झाल्यामुळे मंगळवारी हा अहवाल जिल्हाधिकाºयांच्या स्वाक्षरीनंतर शासनाकडे पाठविण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
शिंदखेडा तालुक्यातील मेथी-विखरण शिवारात औष्णिक ऊर्जा प्रकल्पासाठी जमिनीचे संपादन करण्यात आले होते. परंतु, विखरण येथील धर्मा पाटील यांना त्यांच्या जमिनीचा कमी मोबदला मिळाला होता. त्यासाठी त्यांनी प्रशासकीय व शासकीय पातळीवर पाठपुरावा सुरू ठेवला होता. मात्र, त्यांना न्याय मिळत नव्हते. न्याय मागण्यासाठी ते गेल्या महिन्यात मंत्रालयात गेले होते. तेथेही त्यांच्या पदरी निराशा पडल्याने त्यांनी नैराश्यात येऊन त्यांनी मंत्रालयातच विष प्राशन केले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असताना मुंबईतच त्यांचे निधन झाले होते.
वाढीव मोबदल्यासाठी अहवाल सादर करण्याचे होते आदेश
धर्मा पाटील यांच्या निधनानंतर खडबडून जागे झालेल्या शासनाने त्यांच्या जमीन संपादनाचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश मंत्रालयस्तरावर झालेल्या बैठकीत जिल्हा प्रशासनाला दिले होते. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने कृषी विभागाला आदेश देत अहवाल तयार करून घेतला. या अहवालात धर्मा पाटील यांच्या विखरण शिवारातील गट क्रमांक २९१/२ अ याठिकाणी पाच एकर शेत जमीन संपादनाची कागदपत्रे पडताळणी करण्यात आली. जमीन संपादनाची प्रक्रिया कधी व कशी झाली? त्याची माहिती अहवालात देण्यात आली आहे. जमीन संपादनाच्या प्रक्रियेनंतर धर्मा पाटील यांना ४ लाख ३ हजार रुपये १७ मार्च २०१५ रोजी देण्यात आल्याचे प्रशासनाने अहवालात म्हटले आहे. हा अहवाल स्वाक्षरीसाठी जिल्हाधिकाºयांच्या स्वाक्षरीसाठी देण्यात आला होता. परंतु, सायंकाळी उशिरापर्यंत त्याच्यावर स्वाक्षरी न झाल्याने अद्याप पर्यंत अहवाल शासनाकडे पाठविण्यात आलेला नाही.