परिरक्षण भूमापक एसीबीच्या जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2017 01:37 PM2017-08-24T13:37:17+5:302017-08-24T13:41:22+5:30
कारवाई : पंधराशेची लाच भोवली
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : घराच्या प्रॉपर्टी कार्डावर नाव लावण्याकरीता १ हजार ५०० रुपयांची लाच स्विकारताना परिरक्षण भूमापक आनंद शालीग्राम ठाकूर (३८) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरुवारी रंगेहात पकडले़ ठाकूर यांना पोलिसांनी चौकशीकामी ताब्यात घेतले आहे़ दरम्यान, ठाकूर यांनी २ हजाराची मागणी केली होती़
धुळे शहर हद्दीत घराच्या सिटी सर्व्हेकडील प्रॉपर्टी कार्डावर नाव लावण्याकरीता, खरेदी खत, सुची क्रमांक २ व प्रतिज्ञापत्र अशा विविध कागदपत्रांसह नगर भूमापक अधिकारी कार्यालय, धुळे येथे अर्ज सादर केला होता़ हा अर्ज परिरक्षण भूमापक आनंद ठाकूर यांच्याकडे प्राप्त झाल्यानंतर त्यांनी प्रॉपर्टी कार्डावर तक्रारदार यांचे नाव लावण्याकरीता २ हजार रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात आली होती़ लाच देण्याची इच्छा नसल्याने याबाबतची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे नोंदविण्यात आली़
त्यानुसार मंगळवारी याबाबतची पडताळणी केली असता परिरक्षण भूमापक आनंद ठाकूर यांनी तडजोडीअंती १ हजार ५०० रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले़ त्यानुसार नगरभूमापन कार्यालयात गुरुवारी सापळा रचण्यात आला़ तक्रारदाराकडून १ हजार ५०० रुपयांची लाच स्विकारताना ठाकूर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले़
ही कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक डॉ़ पंजाबराव उगले, धुळ्याचे उपअधीक्षक शत्रुघ्न माळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पवन देसले, महेश भोरटेकर आणि त्यांच्या पथकातील पोहेकॉ जितेंद्र परदेशी, किरण साळी, कैलास शिरसाठ, संतोष हिरे, कृष्णकांत वाडीले, सुधीर सोनवणे, देवेंद्र वेंदे, संदीप सरग, कैलास जोहरे, मनोहर ठाकूर, प्रकाश सोनार, प्रशांत चौधरी, सतिष जावरे, संदिप कदम यांनी केली़