आदिवासी संस्कृतीचे अस्तित्व टिकवा
By admin | Published: January 5, 2017 11:10 PM2017-01-05T23:10:15+5:302017-01-05T23:10:15+5:30
आदिवासी समाज स्नेहसंमेलन : तळोदा येथे ज्येष्ठ साहित्यिक वाहरू सोनवणे यांचे आवाहन
रांझणी : आदिवासी समाजातील खर्चिक व अनिष्ट चालीरिती बदलण्याच्या नावावर समाजाच्या रुढी व परंपरांना फाटा देऊ नका, त्या जोपासा. संस्कृती टिकली तरच आदिवासींचे अस्तित्व टिकेल, असे प्रतिपादन साहित्यिक, कवी वाहरू सोनवणे यांनी तळोदा येथे आदिवासी समाज स्नेहसंमेलन कार्यक्रमात बोलताना केले.
तळोदा येथील चिनोदा चौफुलीजवळ आदिवासी समाज स्नेहसंमेलन झाले. अध्यक्षस्थानी साहित्यिक वाहरू सोनवणे तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री अॅड.पद्माकर वळवी, राजेंद्र गावीत, जि.प.चे उपाध्यक्ष सुहास नाईक, भीमसिंग वळवी, डॉ.राजेश वळवी, जि.प. सदस्य जितेंद्र पाडवी, सतीश वळवी, वेस्ता पावरा, पं.स. सभापती शांताबाई पवार, उपसभापती दीपक मोरे, नितीन पाडवी, वीरसिंग पाडवी, नगरसेवक सत्यवान पाडवी, पं.स.चे माजी आकाश वळवी, पं.स. सदस्य हूपा धना वळवी, जि.प.चे माजी सदस्य दिवाकर पवार, किसन महाराज, सरपंच बळीराम वळवी, ङोलसिंग पावरा, कथा पावरा आदी उपस्थित होते.
संमेलनाचे उद्घाटन देवमोगरा माता व आदिवासी संत महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी वाहरू सोनवणे म्हणाले की, आदिवासी समाजाने संघटित व्हा, सुशिक्षित व्हा, पैशांचा योग्य वापर करावा, सामाजिक सुधारणा करण्यासाठी स्वत:ला बदलले पाहिजे, सामाजिक रुढी परंपरा जोपासा पण अनाठायी खर्च करू नका, सामाजिक संस्कृतीची जोपासना करावी. रुढी परंपरा टिकेल तरच संस्कृती टिकेल, संस्कृती टिकली तर समाज टिकेल, समाजासाठी योगदान देऊन सुशिक्षित तरुणांनी समाजाच्या रुढीपरंपरा, रितीरिवाज संस्कृतीचा अभ्यास करण्याचे आवाहन त्यानी केले.
अॅड.पद्माकर वळवी यांनी सांगितले की, आदिवासी समाजाचे अनेक संमेलने होतात हे वेगळे सामाजिक संमेलन घेतले आहे. या वेळी समाजात थोडा बदल घडवित समाजाचे रुढीपरंपरा जोपासत नवी कास धरली पाहिजे. तसेच समाज संघटित नसल्याने आपल्या समाजावर बोगस आदिवासी म्हणून प्रमाणपत्र घेऊन अतिक्रमण सुरु आहे. त्यासाठी एकत्र येऊन सामाजिक संघटन होऊन लढा दिला पाहिजे. शिक्षणावर भर द्या, व्यसनमुक्त व्हा, समाजाने स्वाभिमानी व्हावे क्रांतीकारी पुरूष व संतांचा विचार आचरणात आणावे व त्याच शिकवणीवर चालले तरच समाजाला दिशा मिळेल, असे सांगितले.
जि.प. उपाध्यक्ष सुहास नाईक, जितेंद्र पाडवी, ङोलसिंग पावरा, योगेश पाडवी यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास कांतीलाल पाडवी, रोहिदास पाडवी, प्रकाश ठाकरे, मांगीलाल वळवी, रणजित वळवी, मोहन ठाकरे, कांताबाई ठाकरे, नारायण वळवी, सावित्रीबाई पाडवी, नवनाथ ठाकरे, मोग्या भिल, नेहरू नाईक, राजकुमार पाडवी व समाज बांधव उपस्थित होते. प्रास्ताविक सतीश वळवी यांनी केले. सूत्रसंचालन प्रकाश ठाकरे यांनी तर आभार प्रवीण वळवी यांनी मानले. (वार्ताहर)