चक्क बोगस बायोडिझेल पंप !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:36 AM2021-05-23T04:36:07+5:302021-05-23T04:36:07+5:30
धुळे तेथे काय न होणे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही; कारण बोगस देशी-विदेशी दारू, बोगस बनावटीची पिस्तुले, बोगस ...
धुळे तेथे काय न होणे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही; कारण बोगस देशी-विदेशी दारू, बोगस बनावटीची पिस्तुले, बोगस डांबर आणि आता चक्क बोगस बायोडिझेल पंपच आढळून आला आहे ! मुंबई-आग्रा महामार्गावर शिरपूर तालुक्यातील दहिवद येथे शिरपूर शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या मुख्य गेटला लागून असलेल्या एका हाॅटेलच्या पाठीमागे हा बोगस बायोडिझेल पंप राजरोसपणे सुरू होता. सांगवी पोलीस ठाण्याने ही कारवाई केली तेव्हा त्याचे बिंग फुटले; अन्यथा हा बायोडिझेल पंप आणखी किती दिवस सुरू राहिला असता हे न सांगितलेलेच बरे !
महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांमध्ये हे डिझेल भरले जात होते. हाॅटेलच्या पाठीमागे असला तरी तो बाहेरून येणाऱ्या चालकांना माहीत होता; पण आमच्या पुरवठा विभागाला तो माहीत नव्हता, ही गोष्ट पचनी न पडण्यासारखी आहे. तसेही पुरवठा विभागाला खुलेआम चालणाऱ्या गोष्टी या त्यांचा बभ्रा झाल्यावरच समजतात.
विशेष गोष्ट म्हणजे हा बायोडिझेल पंप अतिक्रमित जागेत सुरू होता. त्या ठिकाणी एका मोठ्या टाकीत आणि ड्रममध्ये डिझेल साठवून ठेवण्यात येत होते. ते डिझेल ते अन्य पंपांप्रमाणे उभारण्यात आलेल्या मीटर रीडिंग मशीनच्या पाईपद्वारे देण्यात येत होते. म्हणजेच त्या ठिकाणी पूर्ण पंपाचा सेटअप उभारण्यात आलेला होता. कमी होती फक्त जमिनीतील डिझेल साठवण टाकीची आणि अधिकृत परवान्याचीच.
७२ रुपये लिटर - बायोडिझेल हे ७२ रुपये लिटर दराने मिळते. म्हणजे साधारण १० ते १५ रुपयांचा प्रतिलिटर फायदा गाडीचालकाला मिळतो. म्हणून गाडीचालक बायोडिझेल मिक्स करूनच गाड्या चालवितात.
चालता-फिरता पंप
यावर कळस म्हणजे त्यांनी एका मिनीडोअरमध्ये चालता-फिरता डिझेल पंप तयार केलेला होता. त्याद्वारे महामार्गावर ठरावीक अंतरापर्यंत जिथे मागणी असेल तिथे थेट जागेवर डिझेल पुरविण्याचीसुद्धा व्यवस्था करण्यात आलेली होती. हा सर्व प्रकार सुरू असताना त्याची माहिती कोणालाच नव्हती. हे सर्व गेल्या वर्षभरापासून सुरू होते, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. सांगवी पोलिसांनी छापा टाकून साडेचार हजार लिटर डिझेल तेथून जप्त केले. या प्रकरणी चारजणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांपैकी दोघाजणांना पोलिसांनी अटक केली. त्यांची आता न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली आहे.
प्रमुख सूत्रधार सुरतचा
हा बोगस बायोडिझेल आरोपी करण्यात आलेले चार लोक चालवीत असले तरी, त्यांना एवढ्या मोठ्या प्रमाणावर बायोडिझेल पुरविणारा प्रमुख सूत्रधार हा सुरत येथील सोलंकी म्हणून कोणी आहे. ही माहिती अटक केलेल्या दोघाजणांनी पोलिसांना दिली. पोलिसांचे हे पथक सुरतला जाऊनही आले; पण ते रिकाम्या हातांनी परतले.
मिनी बायोडिझेल पंप
हा बोगस बायोडिझेल पंप पोलिसांनी पकडला आहे; पण असे लहान मिनी बायोडिझेल पंप महामार्गावर छुप्या पद्धतीने सुरूच आहे. पण ते घरांत, दुकानांत सुरू असल्याने कोणाच्या लक्षात येत नाहीत. पण महामार्गावर चालणाऱ्या गाडीचालकांना मात्र ते माहीत आहेत. मागे पोलिसांनी दोंडाईचा येथे अशाच छुप्या पद्धतीने बायोडिझेल विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली होती. अशा पद्धतीने कारवाई झाल्यानंतर त्याचा पुढील तपास सुरू राहतो की थांबतो, हे कळत नाही; कारण आरोपीला अटक झाल्यानंतर तो जामिनावर सुटतो आणि पुन्हा ‘जैसे थे’ परिस्थिती निर्माण होते.
असे बऱ्याच प्रकरणात घडताना अनेकांनी पाहिले असल्याने यातही तसेच होईल, असे दहिवद परिसरातील ग्रामस्थ सांगतात. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी तसे होऊ नये यासाठी या प्रकरणाकडे विशेष लक्ष पुरविले पाहिजे, अशी सर्वसामान्य जनतेची अपेक्षा आहे.