अवैध दारू रोखण्यासाठी ग्रामरक्षक दल स्थापन करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2017 12:57 PM2017-09-14T12:57:08+5:302017-09-14T12:59:24+5:30
चंद्रशेखर बावनकुळे यांची धुळ्यात घोषणा : नागरिकांना मिळणार मोबाईलवर वीजबिल
ऑनलाईन लोकमत
धुळे, दि. 14 - अवैध दारू बंद करण्यासाठी मला एसएमएस करा, अवैध दारू रोखण्यासाठी लवकरच ग्रामरक्षक दल नियुक्त करणार असल्याची घोषणा ऊर्जा व राज्य उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी धुळ्यात आयोजित महावितरण कंपनीच्या जनसंवाद कार्यक्रमात केली. यावेळी मंत्र्यांच्याहस्ते 13 वीज उपकेंद्रांचे ई भूमीपूजन करण्यात आले.
कार्यक्रमास रोहयो व पर्यटन मंत्री जयकुमार रावल, पालकमंत्री दादा भुसे, खासदार डॉ.हीना गावीत, महापौर कल्पना महाले, आमदार अनिल गोटे, आमदार डी.एस. अहिरे, भाजपचे जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) बबन चौधरी, शिवसेनेचे महानगर प्रमुख सतीष महाले आदी उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना ऊर्जामंत्री म्हणाले की, महावितरणची प्रलंबित कामे मार्च 2018 र्पयत मार्गी लावण्यात येतील तसेच यापुढे नागरिकांना मोबाईल अॅपद्वारा वीजबिले उपलब्ध होतील, अशी घोषणा त्यांनी केली. धुळे जिल्ह्यात आजही 750 कोटींची वीजबिले थकीत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमास मोठय़ा संख्येने नागरिक, विविध सामाजिक संस्था, संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.