चैत्राम पवार यांच्याहस्ते पिंपळ वृक्ष देऊन पंतप्रधानांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 10:28 PM2018-07-17T22:28:05+5:302018-07-17T22:30:17+5:30
दिल्लीत सोहळा : ग्रामीण भागातील युवा व शेतक-यांनी केलेला सामाजिक बदल ‘नवीन भारता’साठी
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपळनेर : साक्री तालुक्यातील बारीपाडा येथील चैत्राम पवार यांच्याहस्ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पिंपळ वृक्षाचे रोप देऊन सत्कार करण्यात आला. युथ फॉर डेव्हलपमेंटच्या माध्यमातून देशभरातील २९ राज्यांतून आमंत्रित केलेल्या एक हजार व्यक्तींसोबत सोमवारी संध्याकाळी पार पडलेल्या सोहळ्यात हा सत्कार करण्यात आला. आपापल्या भागात उत्तमरीत्या कामे करून विकास साधल्याने सर्व आमंत्रितांचाही पंतप्रधान मोदी यांच्याहस्ते गौरव करण्यात आला.
या प्रसंगी व्यासपीठावर दालमिया भारत ग्रुपचे पुनिल दालमिया, रूरल अॅचिव्हर चैत्राम पवार, युथ फॉर डेव्हलपमेंटचे अध्यक्ष प्रफुल्ल निकम, मृत्युंजय सिंह आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
प्रारंभी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बारीपाड्याचे ‘रूरल अॅचिव्हर’ असलेले चैत्राम पवार यांच्याहस्ते पिंपळ वृक्षाचे रोप देऊन गौरविण्यात आले. विशेष म्हणजे २९ राज्यातून आणलेली माती एकत्र करून त्या मातीत वृक्षारोपण करून ते पवार यांच्याहस्ते पंतप्रधान मोदी यांना देत हा सत्कार झाला.
संपूर्ण देशात आपापल्या परीने ‘नवीन भारत’ उभारण्याचे सामाजिक कार्य करून देशाच्या विकासात मदत करत आहेत, अशा व्यक्तींना दिल्ली येथे झालेल्या या कार्यक्रमास आमंत्रित करण्यात आले होते. देशातील युवा व शेतकरी उत्तम काम करत असल्याने त्याची देशाला मदत होत आहे. विकासाची गती वाढत आहे, अशा नऊ व्यक्तींचाही गौरव पंतप्रधान मोदी यांच्याहस्ते करण्यात आला. ‘रूरल इंडिया हेल्थ’ पुस्तकाचे प्रकाशनही पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आले.
देशाच्या विकासासाठी आपण काम करत आहात. देशाची गरज लक्षात घेऊन वेगवेगळ्या क्षेत्रात भरीव योगदान देत देशात परिवर्तन करत आहात. आपला येथे झालेला गौरव हा तुम्ही करत असलेल्या कार्यासाठी प्रेरणादायी ठरेल, असे सांगून देशातही मोठ्या प्रमाणात बदल होत असून आपण त्याचा अनुभव घेत असल्याचेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
यापूर्वीही युथ फॉर डेव्हलपमेंटतर्फे मुंबईत आयोजित कार्यक्रमात अभिनेता अक्षय कुमार याच्याहस्ते चैत्राम पवार यांचा गौरव झाला होता. या निमित्ताने देशातील अशा व्यक्तींना दिल्ली येथे आमंत्रित करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उदघाटन उपराष्टÑपती एम. व्यंकय्या नायडू यांच्याहस्ते तर समारोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते झाला. चैत्राम पवार यांच्यासोबत येथून गेलेले डॉ.मनीष सूर्यवंशी, अनिल पवार, नितीन जगदाळे, शरद मोरे, रूपचंद पवार आदी या सोहळ्यात उपस्थित होते.
या कामात तुम्ही-आम्ही सर्वजण सोबत आहोत.सर्वांनी मिळून काम केले आहे, त्यादृष्टीने हा महत्त्वाचा क्षण आहे. हे सामुदायिक काम असून कोणा एका व्यक्तीचे काम नाही. अशा सर्वांचा प्रतिनिधी म्हणून मी तेथे पोहचलो, अशी प्रतिक्रिया चैत्राम पवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.