पंतप्रधान नरेंद्र मोदींची धुळे येथे नियोजित सभा होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2019 01:43 PM2019-02-15T13:43:49+5:302019-02-15T13:46:43+5:30
नवी दिल्लीतून केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांची माहिती
धुळे - जम्मू- काश्मीरमधील पुलवामा येथे दहशतवाद्यांच्या हल्ल्याची घटना घडल्याचे कळताच केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे तातडीने गुरुवारी रात्री दिल्लीला रवाना झाले. शहीद जवानांच्या बलिदानाला आम्ही व्यर्थ जाऊ देणार नाही, दहशतवादी संघटना आणि पाकिस्तानला चोख उत्तर दिले जाईलच, अशी भावना मंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, उद्या १६ फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नियोजित जाहीर सभा आणि भूमिपूजनाचा कार्यक्रम होणार असल्याची माहितीही मंत्री डॉ.भामरे यांनी नवी दिल्ली येथून गुरूवारी दुपारी दिली आहे.
जम्मू - काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमिवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा १६ फेब्रुवारी रोजी होणारा धुळे जिल्हा दौरा रद्द होण्याची शक्यता वर्तवली जात होती. परंतु दहशतवाद्यांना चोख उत्तर देण्यासाठी देशाच्या सैन्य दलाला पंतप्रधान मोदी आणि संरक्षण मंत्रालयाने आवश्यक त्या सूचना देत पूर्णपणे खुली सूट देत असल्याचे स्पष्ट केले आहे. देशावर झालेला हा हल्ला भारत सरकार कदापी सहन करणार नाही. या हल्ल्याला योग्य वेळी, चोख प्रत्युत्तर देण्यात येणार आहे. भारतीय सैन्य दल यासाठी सक्षम असल्याचे संरक्षण राज्यमंत्री डॉ. भामरे यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक नितीन गडकरी आदी मान्यवर उद्या १६ रोजी दुपारी १ वाजता नियोजित कार्यक्रमानुसार धुळ्याला येतील. त्यांच्या हस्ते मनमाड-धुळे-इंदूर रेल्वेमार्ग, सुलवाडे-जामफळ उपसा सिंचन योजना, अक्कलपाडा धरण ते धुळे शहर पाईपलाईन योजनांचे भूमिपूजन आणि विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात येईल, तसेच नियोजित जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करतील, असेही.डॉ. भामरे यांनी दिल्ली येथून कळविले आहे.