पंतप्रधान साधणार धुळ्यातील स्वच्छतादूतांशी संवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2018 05:14 AM2018-04-09T05:14:54+5:302018-04-09T05:14:54+5:30
बिहारमधील चंपारण्य सत्याग्रहाचा शताब्दी वर्षाचा समारोप मंगळवारी होत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी तेथील ‘सत्याग्रह से स्वच्छाग्रह’ कार्यक्रमात सहभागी होऊन देशातील २० गावांमधील स्वच्छतादूतांशी संवाद साधणार आहेत.
धुळे : बिहारमधील चंपारण्य सत्याग्रहाचा शताब्दी वर्षाचा समारोप मंगळवारी होत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी तेथील ‘सत्याग्रह से स्वच्छाग्रह’ कार्यक्रमात सहभागी होऊन देशातील २० गावांमधील स्वच्छतादूतांशी संवाद साधणार आहेत. यात महाराष्टÑातील धुळे व भुसावळ (जि. जळगाव) येथील स्वच्छतादूतांचाही समावेश आहे.
महात्मा गांधी यांनी सत्याग्रहाची सुरुवात चंपारण्य येथून केली होती. या घटनेला १०० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त गतवर्षीपासून चंपारण्य सत्याग्रह शताब्दी कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. त्याचा समारोप मंगळवारी चंपारण्य येथे होत आहे.
यावेळी पंतप्रधान देशातील स्वच्छता क्षेत्रात काम करणाऱ्या स्वच्छतादूतांशी सकाळी १० ते दुपारी १ यावेळेत संवाद साधणार आहेत. त्यासाठी देशातील २० गावांची निवड करण्यात आलेली आहे.