धुळ्यातील यात्रोत्सवात संसारपयोगी साहित्य खरेदी करण्यास प्राधान्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2018 04:10 PM2018-04-02T16:10:50+5:302018-04-02T16:10:50+5:30
चायनिज ज्वेलरी वेधताहेत भाविकांचे लक्ष; यात्रेत लाखो रुपयांची उलाढाल
आॅनलाइन लोकमत
धुळे : खान्देश कुलस्वामिनी एकवीरा देवी यात्रोत्सवात भाविकांची गर्दी वाढण्यास सुरुवात झाली आहे. दर्शन घेतल्यानंतर भाविक यात्रेत फिरून संसारपयोगी साहित्य खरेदीला विशेष प्राधान्य देत आहेत. तर अनेक महिलांना चायनिज ज्वेलरींनी भुरळ घातली आहे. यात्रेत खरेदी वाढल्याने लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. दरम्यान, शहरातील विविध महाविद्यालयातील तरुण-तरुणीही यात्रेत धमाल करत असल्याचे दिसून येते.
चैत्र पौर्णिमेपासून यात्रोत्सवाला सुरुवात झाली. यात्रेत धुळे शहरासह तालुक्यातील सोनगीर, नगाव, देवभाणे, मुकटी, फागणे, कुसुंबा, नेर, आर्वी, मोहाडी उपनगर परिसरातील भाविक मोठ्या संख्येने यात्रेत येऊ लागले आहेत. यात्रेत कुटुंबाचा गाडा पुढे रेटण्यासाठी अनेक जण हाताला जे काम मिळेल, ते करताना दिसत आहे. बहुतांश विक्रेत्यांनी स्वत: तयार केलेल्या वस्तू विक्रीसाठी ठेवल्या आहेत. या वस्तूंना भाविकांकडून विशेष मागणी मिळत आहे.
विक्रेत्यांनी स्वत: तयार केल्या वस्तू
एकवीरादेवी मंदिर परिसर ते पुढे पंचवटीपर्यंत विक्रेत्यांनी जी दुकाने लावली आहेत. पैकी तीन विक्रेत्यांनी चक्क खराब लाकडापासून संसारपयोगी वस्तू तयार केल्या आहेत. त्यात पोळपाट, लाटणे, पाट, बॅट या वस्तूंचा समावेश असून तर याच विक्रेत्यांनी बटाटे, कैºया व टोमॅटो कापण्यासाठी लागणारे यंत्र, एवढेच नव्हे; तर शेंगदाण्याचा कूट तयार करण्यासाठी लागणारे छोटे मिक्सर स्वत: तयार केले आहे. या वस्तूंची किंमत ३० ते ५५० रुपयांपर्यंतच्या असल्याची माहिती सैय्यद शेख या विक्रेत्याने दिली.
चायनिज अलंकाराचे आकर्षण
एकवीरादेवी मंदिराकडून पुढे पंचवटीकडे जाणाºया रस्त्यावर तीन ते चार विक्रेत्यांनी खास चायनिज दागिने विक्रीसाठी त्यांच्या दुकानावर ठेवली आहेत. यात कानातले, हातातील बांगड्या व गळ्यातील नेक्लेस अशा दागिन्यांचा समावेश आहे. ज्या भाविकांना सोन्याचे महागडे अलंकर घेणे शक्य नाही, असे भाविक चायनिज अलंकर खरेदी करताना दिसत आहेत. या दागिन्यांची किंमत २५० ते ५५० रुपयांपर्यंत असल्याचे बाबू शेठ या विक्रेत्याने सांगितले. शहरातील विविध महाविद्यालयातील अनेक तरुणी फॅन्सी प्रकारातील चप्पल व इतर साहित्य खरेदी करत आहेत. तरुण वर्गही पाळण्यांमध्ये बसून मज्जा लुटत आहेत.