जिद्दीच्या बळावर ७० दिवसात ७५ टन टरबुजचे उत्पादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2020 12:13 PM2020-05-03T12:13:58+5:302020-05-03T12:15:36+5:30

गोताण्यातील शेतकरी । ३ एकरची जमीन, संकटावर केली मात

Production of 75 tons of watermelon in 70 days on the strength of perseverance | जिद्दीच्या बळावर ७० दिवसात ७५ टन टरबुजचे उत्पादन

जिद्दीच्या बळावर ७० दिवसात ७५ टन टरबुजचे उत्पादन

Next

धुळे : ओल्या दुष्काळाचे संकट, त्यातच कोरोना आजारामुळे गेल्या दीड महिन्यांपासून असलेल्या टाळेबंदीमुळे शेती व्यवसाय धोक्यात आलेला आहे़ मात्र या नैसर्गिक आणि मानवी संकटावर मात करीत धुळे तालुक्यातील गोताणे येथील आनंदा रामभाऊ पाटील या प्रगतीशील तरुण शेतकऱ्याने आपल्या जिद्दीच्या बळावर आधुनिक शेती करीत ७० दिवसात ३ एकरात ७५ टन उत्पन्न घेत टरबूजची यशस्वी शेती करुन दाखविली आहे़ पिकविलेला शेतीमाल त्यांनी थेट ग्राहकांच्या घरापर्यंत पोहचविल्याने नफ्याची शेती केली आहे़
नैसर्गिक असो वा मानवी संकट असो त्यात पहिले नुकसान होते ते शेतकऱ्यांचे़ ओल्या दुष्काळामुळे शेतकरी पूर्णपणे उदध्वस्त झाला होता़ अशातच रब्बीच्या आशेवर असलेल्या शेतकºयांच्या स्वप्नांवर कोरोनाच्या आजारामुळे लावलेल्या टाळेबंदीने पाणी फिरविले़ शेतकºयांनी फळे, भाजीपाला यांची भरघोस उत्पन्न शेतीत पिकविले़ मात्र, टाळेबंदीने बाजारपेठा बंद असल्याने त्यांचा शेतीमाल विक्री होत नाही आणि झालाच भाव नाही़ त्यामुळे अनेकांनी हतबल होऊन आपली पिके उभ्यानेच नांगरुन काढली आणि पुन्हा शेतकरी कर्जबाजारी झाला़ मात्र या सर्व संकटावर मात करीत धुळे तालुक्यातील गोताणे येथील प्रगतीशील शेतकरी आनंदा जिभाऊ पाटील यांनी आपल्या जिद्दीने आणि बुध्दीकौशल्याने टाळेबंदीतही टरबूजची शेती यशस्वी करुन दाखविली़ याकामी खतांची मात्रा आणि विविध रोगराईचा प्रादुर्भाव दूर करण्यासाठी फवारणीचे निकुंभे येथील एकनाथ वाघ यांनीही मार्गदर्शन केले़ योग्य मार्केटींग करीत भरघोस आर्थिक उत्पन्नही घेतले़
धुळे तालुक्यातील गोताणे गाव हे कृषीप्रधान आहे़ कमी क्षेत्रात उत्तम शेती करण्याचे कसब येथील शेतकºयांमध्ये आहे़ त्यापैकी आनंदा पाटील यांनी आपल्या एकूण ३ एकर शेतीत गेल्या अडीच महिन्यांपुर्वी टरबूजची लागवड केली़ आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा वापर करीत मल्चिंंग पेपरने पिकांचे संगोपन केले़ ठिबक सिंचन पध्दतीने कमी पाण्यात उत्पन्न घेतले़ त्यातून केवळ ७० दिवसात तीन एकरमध्ये ७५ टन टरबूजचे उत्पन्न घेतले़ बहुतांश एका टरबुजचे वजन ८ ते १० किलोपर्यंत आलेले आहे़ टाळेबंदीमुळे उत्पन्नाच्या विक्रीचा प्रश्न निर्माण झाला़ मात्र त्यावर तोडगा काढत त्यांनी स्वत: पिकविलेला शेतीमाल ग्राहकांच्या दारात नेवून विकला़ त्यामुळे त्यांचा चांगलाच आर्थिक फायदा झाला़ आनंदा पाटील यांनी यापुर्वीच डाळींब, शेवगा अशी पिके घेतली आहेत़

Web Title: Production of 75 tons of watermelon in 70 days on the strength of perseverance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे