विद्यार्थ्यांच्या कल्पकतेतून विज्ञानाची प्रगती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2019 11:12 PM2019-12-24T23:12:16+5:302019-12-24T23:12:50+5:30
प्रा.डॉ.प्रशांत सोनार : साक्री तालुका विज्ञान प्रदर्शनाचा उत्साहात समारोप, विजेत्यांचा मान्यवरांच्याहस्ते गौरव
पिंपळनेर : विद्यार्थ्यांच्या कल्पकतेत विज्ञानाची प्रगती सत्यात उतरविण्याचे सामर्थ्य असते, असे प्रतिपादन आॅस्ट्रेलिया येथील क्वींसलँड युनिव्हर्सिटीचे वैज्ञानिक व प्रा.डॉ. प्रशांत सोनार यांनी साक्री तालुका विज्ञान प्रदर्शनाच्या समारोपप्रसंगी केले.
येथील सेयान इंटरनॅशनल स्कूल येथे शिक्षण विभाग पंचायत समिती साक्री, तालुका माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ, व साक्री तालुका विज्ञान व गणित अध्यापक संघ तसेच इंटरनॅशनल स्कूल व माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने ४१ वे साक्री तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन व शैक्षणिक साहित्य प्रदर्शन भरविण्यात आले होते. विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन नंदुरबारचे जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांच्या हस्ते करण्यात आले. यात साक्री तालुक्यातील बालवैज्ञानिकांनी विविध गटातून २६० उपकरणांचे सादरीकरण केले होते.
याप्रसंगी जिल्हाधिकारी राजेंद्र भारुड यांनी विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटनानंतर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध उपकरणांची पाहणी केली व विद्यार्थ्यांकडून उपकरणांविषयी माहिती जाणून घेतली.
याप्रसंगी प्रमुख अतिथी प्राचार्या विद्या पाटील, मिनाक्षी गिरी, देवयानी वाघ, पी.एम. कदम, डॉ.विवेकानंद शिंदे, संस्थेचे अध्यक्ष दिलीप बधान, रुपेश बधान, डॉ,राजेंद्र अहिरे, बी.एस. वाणी, अनिल शिंदे, विजय बोरसे, डी.व्ही. सूर्यवंशी, सुहास सोनवणे, ए.बी. मराठे, आर.व्ही. पाटील, पी.झेड. कुवर, एस.डी. पाटील यांच्यासह विज्ञान मंडळाचे सदस्य व्यासपीठावर उपस्थित होते.
विविध मान्यवरांनी विज्ञान प्रदर्शनाविषयी मनोगत व्यक्त करुन विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक शेखर बागुल यांनी केले. सूत्रसंचालन आकाश ढोले माधुरी महाले तर आभार प्रदर्शन संस्थेचे संचालक रुपेश बधान यांनी केले.
प्राथमिक गटातील उपकरणाचे परिक्षण विज्ञान शिक्षक नितीन सोनवणे, मुस्तफा शेख व शिक्षिका ए.व्ही. सोनवणे यांनी केले. माध्यमिक गटाचे परिक्षण डॉ.सचिन नांद्रे, एस.आर. भदाणे, ए.यु. कोठावदे, पी.एस. साळुंखे तर शैक्षणिक साहित्य गटाचे परिक्षण उमराव भदाणे व दिनेश नहीरे यांनी केले.
तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनातील विविध गटातील विजेत्यांचा स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्याहस्ते गौरव करण्यात आला.