पिंपळनेरला बंद, दलित, आदिवासी समाजबांधवांतर्फे निषेध मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2018 12:10 PM2018-04-02T12:10:23+5:302018-04-02T12:10:23+5:30
बहुतांश व्यवसाय, दुकाने बंद, महिलांचा लक्षणीय सहभाग
पिंपळनेर, ता.साक्री - अॅट्रॉसिटी कायद्यात सूचविलेल्या दुरुस्तींविरोधात पिंपळनेर येथे सोमवारी बंद पुकारण्यात आला आहे. दलित व आदिवासी समाजबांधवांनी सूचविलेल्या दुरुस्तींना विरोध करत सकाळी निषेध मोर्चा काढला व बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. केंद्र सरकारने या दुरुस्तींसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
अनुसूचित जाती व जमातीतील नागरिकांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात फेरविचाराची याचिका दाखल करावी या मागणीसाठी आदिवासी, दलित व चर्मकार समाज तसेच अनसूचित जाती व जमातीतील नागरिक सकाळी काढण्यात आलेल्या निषेध मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यात महिलांचा सहभाग लक्षणीय होता. त्यांनी हातात आपापल्या संघटना व पक्षाचे ध्वज हातात घेतले होते. यावेळी घोषणाही देण्यात आल्या. पोलिसांकडून बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पिंपळनेर शहरात बहुतांश व्यापार, व्यवसाय व दुकाने बंद आहेत. दरम्यान काही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी पोलीस लक्ष ठेवून आहेत. तसेच आवश्यक ठिकाणी बंदोबस्त तैनात केला आहे.