शेतकरी गटाचा प्रकल्प आराखडा मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2019 10:32 PM2019-02-17T22:32:47+5:302019-02-17T22:33:42+5:30
कासारे : पावणेदोन कोटींचा आराखडा, राज्य शासन देणार १ कोटीचे अनुदान
कासारे : राज्य शासनाच्या गटशेतीस चालना व सबलीकरण योजना २०१८-१९ मध्ये साक्री तालुक्यातील कासारे येथील मी कासारेकर सेंद्रीय उत्पादक शेतकरी गटाच्या सविस्तर प्रकल्प आराखड्याला जिल्हास्तरीय निवड समितीने नुकतीच मंजुरी दिली. या पावणेदोन कोटी रुपयांचा आराखडा असलेल्या प्रकल्पाला राज्य शासनाकडून एक कोटी रुपयांचे अनुदान प्राप्त होणार आहे.
जिल्हास्तरीय समितीत जिल्हाधिकारी हे अध्यक्ष तर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हे सचिव असतात.
मी कासारेकर सेंद्रीय उत्पादक शेतकरी गट हा कासारे गावातील ३२ शेतकऱ्यांचा गट आहे. या गटाने विषमुक्त/सेंद्रीय भाजीपाला निर्मिती व ग्राहकांपर्यंत थेट विक्री हा प्रकल्प हाती घेतला आहे.
विषमुक्त भाजीपाला ही काळाची गरज असूनही त्याच्या निर्मितीसाठी संघटितपणे प्रयत्न होताना दिसत नाही. मात्र, या गटाने ही गरज ओळखून साक्री, पिंपळनेर व धुळे शहरातील चोखंदळ व सजग ग्राहकांसाठी विषमुक्त सेंद्रीय शेतमाल उपलब्ध करून देण्याचे ठरवले आहे.
या प्रकल्पाचे लवकरच विधीवत उद्घाटन करण्यात येणार असल्याची माहिती मी कासारेकर सेंद्रीय उत्पादक शेतकरी गटाचे प्रवर्तक अभय देसले यांनी दिली.
प्रकल्पातून शेतमालासह विविध निर्मिती
मी कासारेकर सेंद्रीय उत्पादक शेतकरी गटाच्या या प्रकल्पात देशी वाणांच्या वापरातून विषमुक्त सेंद्रीय भाजीपाला तसेच इतर शेतमालाची निर्मिती, गीर गाईंचा सामूहिक गोठा, सोलर ड्रायर, कोल्ड स्टोअरेज, कांदा करपी फ्रायर यासोबतच सेंद्रीय खत व किटकनाशके यांची निर्मिती करण्यात येणार आहे, असल्याची माहिती गट प्रवर्तकांनी दिली.