प्रकल्पांमधून अद्याप विसर्ग सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2019 10:49 PM2019-09-13T22:49:48+5:302019-09-13T22:50:28+5:30

संततधार पाऊस : पांझरा, अमरावती नदीकाठावरील गावांना नियमित सूचना

 Projects still underway | प्रकल्पांमधून अद्याप विसर्ग सुरू

dhule

googlenewsNext

धुळे : जिल्ह्यात तसेच जिल्ह्यालगतच्या परिसरात सातत्याने होणाऱ्या पावसामुळे अक्कलपाडा प्रकल्पासह जिल्ह्यातील चार धरणांमधून पाण्याचा नियमित विसर्र्ग केला जात आहे. त्यामुळे नद्यांना पूर सुरू असून नदीकाठच्या गावांसाठी प्रशासनाला सतत सतर्कतेच्या सूचना द्याव्या लागत आहेत. अक्कलपाडा, अमरावती, वाडीशेवाडी व सुलवाडे बॅरेज या प्रकल्पांमधून विसर्ग केला जात आहे.
राज्यात अन्यत्र सुरू असलेल्या पावसापेक्षा जिल्ह्यात प्रमाण कमी असले तरी सातत्याने होणाºया पावसामुळे प्रकल्प फुल्ल झाले असून शेतजमिनीचीही तहान भागल्याने आता पडणाºया पावसाचे पाणी पोहचत असल्याने नद्या-नाल्यांना पूर आले आहेत. काही नद्यांना तर कित्येक वर्षांनंतर पूर आल्याने तो पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे.
माळमाथ्यावर संततधार पाऊस
साक्री तालुक्यात शुक्रवारी दुपारपासून माळमाथा भागात संततधार पाऊस झाला. निजामपूर, जैताणे, खुडाणे, वाघापूर, उभरांडी, आखाडे आदी गावशिवारांमध्ये झालेल्या या पावसामुळे नदी-नाले तुडूंब भरून वाहत आहेत. तालुक्यात होत असलेल्या या पावसामुळे सर्व लहान-मोठे प्रकल्प अद्याप ओसंडून वाहत आहेत.
अक्कलपाडा प्रकल्पातून
१८०० क्युसेक विसर्ग
अक्कलपाडा मध्यम प्रकल्पातून सातत्याने विसर्ग होत असून पांझरा नदीला पूर आला आहे. या प्रकल्पावर साक्री तालुक्यात असलेल्या पांझरा (लाटीपाडा), मालनगाव व जामखेडी या तिन्ही प्रकल्पांमधून विसर्ग सुरू असल्याने ते पाणी अक्कलपाडा प्रकल्पात येत आहे. त्यामुळे तत्पूर्वीच या प्रकल्पातून विसर्ग करावा लागत असल्याची माहिती कार्यकारी अभियंता ए.एस. पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. साक्री तालुक्यासह या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस होत असल्याने त्या तिन्ही धरणांमधून पाण्याचा ओघ अक्कलपाडा प्रकल्पात नियमित सुरू आहे. तो थांबत नाही तोपर्यंत विसर्ग सुरूच ठेवावा लागणार असल्याचेही ते म्हणाले.
अमरावती, वाडीशेवाडी प्रकल्पांमधूनही विसर्ग
अमरावती प्रकल्पातून सकाळी आठ वाजेच्या सुमारास दीड हजार क्युसेक विसर्ग करण्यात आला आहे. तर वाडीशेवाडी प्रकल्पातूनही ६०० क्युसेक विसर्ग केला जात आहे. अमरावती व वाडीशेवाडी हे दोन्ही प्रकल्प अनेक वर्षांनंतर पूर्ण क्षमतेने भरले आहेत. त्यामुळे या प्रकल्पांमधून नदीपात्रांमध्ये विसर्ग करण्यास विरोध करण्यात आला होता. परंतु विसर्ग करणे गरजेचे असल्याचे त्यांना समजावून सांगण्यात आले. प्रकल्पांमधून पाणी विसर्ग करण्यापूर्वी कालव्यांमध्ये सोडण्यात आले. परंतु सर्वत्र पाऊस होत असल्याने सर्व लहान-मोठे बंधारे, एम.आय. टॅँक सर्वच भरल्याने नदीपात्रात विसर्ग करण्याखेरीज पाटबंधारे विभागापुढे पर्याय नाही. त्यामुळे सध्या विसर्ग सुरूच असल्याचे सांगण्यात आले.

Web Title:  Projects still underway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे