नमाज घरीच पठन करण्याचे दिले आश्वासन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2020 10:27 PM2020-05-23T22:27:20+5:302020-05-23T22:27:38+5:30
संडे अँकर । सोनगीर पोलीस ठाण्यात रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक
सोनगीर : मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान ईद सोमवारी साजरी केली जाणार आहे. परंतु सद्य:स्थितीचे गांभीर्य लक्षात घेता, कोरोनावर मात करण्यासाठी यावर्षी नमाज पठणाकरिता मुस्लिम बांधवांनी मशीद अथवा कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी एकत्र न येता, घरामध्येच धार्मिक कार्य पार पाडून शासन व पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असे उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत घुमरे यांनी शांतता व दक्षता समितीच्या बैठकीत आवाहन केले.
मुस्लिम बांधवांसाठी पवित्र असलेल्या असलेल्या रमजानच्या ईद च्या पार्श्वभूमीवर येथील पोलीस ठाण्यात शांतता व दक्षता समितीची बैठक घेण्यात आली. या प्रसंगी श्री घुमरे म्हणाले की रमजान ईद हा सण शांतता व प्रेमाचे प्रतीक आहे. या उत्सवाचा आपण आनंद घेत असताना इतरांना त्या आनंदात सामावून घेतल्यास आनंद द्विगुणित होतो.
या प्रसंगी पोलीस प्रशासनाने केलेल्या सूचनांना मुस्लिम समाजातर्फे प्रतिसाद देत नमाज पठाण घरातच केले जाईल व संपूर्ण सहकार्य करू असे मुस्लिम समाजाच्या वतीने आरिफ पठाण यांनी सांगितले. याप्रसंगी अविनाश महाजन, ग्रामपंचयात सदस्य विशाल मोरे, अबीद कुरेशी, तसेच अहमद शहा, शेख शरीफ अनिस कुरेशी, युसुफ पठाण, शफयोद्दीन पठाण, अल्ताफ खा पठाण, सरदार कुरेशी, आरिफ पठाण, हाफीज, मोहसीन आदी उपस्थित होते़
पोलिसांचेही आवाहऩ़़
सोनगीर सहायक पोलिस निरीक्षक प्रकाश पाटील यांनी मनोगत व्यक्त करीत असताना सांगितले की, कोरोना हा संसर्गजन्य आजार असल्याने याची लागण एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीस त्वरित होते. त्या करिता प्रत्येकाने सुरक्षित अंतर ठेवावे व मास्क लावूनच गरज असल्यास बाहेर पडावे तसेच गर्दी करणे टाळावे. पोलीस प्रशासनास सहकार्य करावे असेही ते म्हणाले़
सर्वांनाच केल्या मार्गदर्शक सूचना
सोनगीर पोलीस ठाण्यात बैठक आयोजित केल्यामुळे केवळ मुस्लिम समाजालाच पोलिसांनी सुचना केल्या असे नाही तर संपूर्ण नागरीकांनाच मार्गदर्शक सूचना केल्या आहेत़ कोणीही घराबाहेर पडू नये, मास्क लावण्यात यावा असेही सांगण्यात आले़