भाजपचे गुंडगिरीला प्रोत्साहन, हा घ्या संभाषणाचा पुरावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2018 01:32 PM2018-11-26T13:32:11+5:302018-11-26T13:34:18+5:30
अनिल गोटे : पत्रपरिषदेत ध्वनिफीत ऐकविली, मनसेचा लोकसंग्रामला विनाशर्त पाठिंबा
लोकमत आॅनलाईन
धुळे - आपल्यासह कुटुंबीयांविषयी आक्षेपार्ह मजकूर सोशल मीडियावर व्हायरल करणा-या विनोद थोरातला भाजपच्या मंत्र्यांसह पदाधिका-यांची फूस असून पक्षातर्फे गुंडगिरीला प्रोत्साहन दिले जात असल्याचा आरोप भाजपचे येथील आमदार अनिल गोटे यांनी सोमवारी घेतलेल्या पत्रपरिषदेत केला. त्या पुष्ट्यर्थ त्यांनी पोलीस अधिकारी व नागरिक यांच्यात झालेल्या संभाषणाची ध्वनिफीतही माध्यमांच्या प्रतिनिधींना उपलब्ध करून दिली. याचवेळी मनसेचे शहराध्यक्ष डॉ.मनिष जाखेटे यांनी महापालिका निवडणुकीत लोकसंग्रामला विनाशर्त पाठिंबा दिल्याची माहिती दिली.
आक्षेपार्ह मजकूर सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी विनोद थोरात याच्याविरूद्ध आझादनगर पोलिसांत हेमा गोटे यांच्या फिर्यादीवरून विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी या प्रकरणी थोरात यास चाळीसगाव येथून त्याच्या नातेवाईकाच्या घरून अटक केली. येथे आणून त्यास मोहाडी उपनगर पोलीस ठाण्याच्या लॉकअप ठेवण्यात आले होते. त्याचदिवशी त्याची जामिनावर मुक्तता करण्यात आली होती.
या संदर्भात आपण पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन संभाषण ध्वनिफीती (सीडीआर)ची मागणी केली असल्याचेही आमदार गोटे यांनी यावेळी सांगितले. गुन्हा दाखल झाल्यानंतर थोरात फरार झाला. तो इकडे-तिकडे लपत फिरत होता. शहरातील पोलीस यंत्रणा त्यास शोधण्याचा बहाणा करीत होती. त्यामुळे आपणास पोलिसांना इशारा दिला. आणि त्याच दिवशी रात्री ११.३० वाजता पोलिसांनी थोरात यास चाळीसगाव येथून अटक करून मोहाडी उपनगर पोलीस ठाण्याच्या लॉकअपमध्ये ठेवले होते. दुस-या दिवशी कोर्टात हजर केल्यानंतर त्यास जामीन मंजूर करण्यात आला होता.
आमदार गोटे यांनी दिलेल्या ध्वनिफीतीत पोलीस अधिकारी व नागरिक या दोघांमध्ये संवाद आहे. पोलीस अधिकाºयाने दिलेल्या माहितीनुसार आरोपी थोरात हा मंत्री गिरीष महाजन, जयकुमार रावल, पदाधिकारी हिरामण गवळी, नाना कर्पे यांच्या संपर्कात असल्याचे म्हटले आहे. थोरात स्वत: सांगत होता की मी या सर्वांशी संपर्कात होतो. मला बाहेरील सर्व माहिती त्यांच्यामार्फत कळत होती. त्याला चाळीसगाव येथून पकडून आणताना प्रवासात भिकन वराडे यांचाही फोन आला. तेव्हा त्याच्याकडील फोन घेऊन स्वीचआॅफ केल्याचे पोलीस अधिकारी नागरिकाला सांगतात, हेही त्या ध्वनिफीतीत आहे.
मनसेचा लोकसंग्रामला विनाशर्त पाठिंबा
महाराष्टÑ नवनिर्माण सेनेच्या महानगर शाखेने या महापालिका निवडणुकीत आमदार अनिल गोटे यांच्या नेतृत्वात लढणा-या लोकसंग्राम पक्षाला विनाशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. या पक्षाचे शहराध्यक्ष डॉ.मनिष जाखेटे यांनी त्याबाबत या पत्रपरिषदेत माहिती दिली. समविचारांच्या आधारावर हा पाठिंंबा जाहीर केल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी आमदार अनिल गोटे, लोकसंग्रामचे अध्यक्ष तेजस गोटे, मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश मोरे, निवडणूक प्रमुख योगेश मुकुंदे आदी उपस्थित होते.