ट्रक टर्मिनस ‘बीओटी’वर देण्याचा प्रस्ताव
By admin | Published: March 20, 2017 12:42 AM2017-03-20T00:42:35+5:302017-03-20T00:42:35+5:30
महापालिका : नाशिक मनपाकडून मार्गदर्शन मागविणार, त्रिसदस्यीय समितीचा अहवाल सादर
धुळे : महापालिकेने मुंबई-आग्रा महामार्गावरील हॉटेल रेसिडेन्सी पार्कजवळ तयार केलेले ट्रक-टर्मिनस ‘बीओटी’वर देण्याचा प्रशासनाचा विचार आहे़ तत्पूर्वी, नाशिक महापालिकेकडून ट्रक टर्मिनससंदर्भात माहिती मागविण्यात येणार असल्याचे मनपा सूत्रांनी सांगितले़
महापालिकेने मुंबई-आग्रा रोडवर रेसिडेन्सी पार्कजवळ ट्रक टर्मिनसची निर्मिती केली आहे़ जवळपास ६५ लाख रुपयांचा खर्च करून या ठिकाणी ३० गाळे बांधण्यात आले आहेत़ मात्र हे ट्रक टर्मिनस मनपाने चालवयाचे की ‘बीओटी’वर देऊन आणखी अधिकाधिक सुविधा देऊन चांगल्या पद्धतीने उभारून सुरू करायचे, यावर प्रशासनाचा विचार सुरू आहे़ १९९१ पासून ट्रक टर्मिनसचा प्रस्ताव प्रलंबित होता. महापालिकेने दोन वर्षांपूर्वी त्यासाठी काम सुरू केले होते़
अवजड वाहनांस बंदी, पण़़़
शहरातील दोन ते तीन हजार व्यावसायिक हे ट्रान्सपोर्टेशनचे काम करतात़ त्यामुळे मालवाहतुकीसाठी येणारे ट्रक त्यांना चाळीगाव रोड, ऐंशी फुटी रोड, पारोळा रोड, बाजार समिती परिसर, सुशीनाला पूल, कॉलनी परिसरात उभ्या कराव्या लागतात़ शहरात सकाळी ८ ते रात्री १० पर्यंत अवजड वाहनांना बंदी आहे. मात्र ट्रक-टर्मिनसची व्यवस्था नसल्याने ट्रकला शहरात यावे लागते़ काही दिवसांपूर्वीच एका ट्रकने आग्रा रोडवर विद्युत डीपीला धडक दिल्याने मोठा अपघात झाला होता़ त्याचप्रमाणे शहरातील रस्ते आधीच अरुंद असून वर्दळदेखील प्रचंड वाढली आहे़ अशा वेळी ट्रकने मार्गक्रमण केल्यास वाहतुकीचा खोळंबा होतो़ परिणामी, शहर वाहतूक शाखेला अडचणींचा सामना करावा लागतो़
‘बीओटी’वर देण्याचा प्रस्ताव!
पारगमन शुल्क वसुली होत असताना ट्रक चालक-मालक संघटनेकडून मनपा प्रशासनाकडे पार्किंगसाठी जागेची मागणी करण्यात आली होती. यासाठी धरणे आंदोलनही करण्यात आले होते. तत्कालीन आयुक्त हनुमंत भोंगळे यांनी पार्किंगसाठी जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते. अखेर महापालिकेने ट्रक टर्मिनसची निर्मिती करण्यासाठी गाळे बांधले असले तरी आनुषंगिक सुविधा उपलब्ध करणे आवश्यक आहे़ अन्यथा, ट्रक-टर्मिनसला प्रतिसाद मिळणार नाही, उलट उभारलेल्या गाळ्यांचे तसेच साहित्याचे नुकसान होईल, अशी भीती मनपा प्रशासनाला आहे़ त्यामुळे ट्रक टर्मिनसच्या माध्यमातून मनपाला उत्पन्न मिळावे यासाठी ते परिपूर्ण करण्याच्या दृष्टीने मनपाकडून ट्रक टर्मिनस ‘बीओटी’वर देण्याचा विचार सुरू आहे़ बीओटीवर ते दिल्यास पुरेशा सुविधांची निर्मिती केली जाईल. मात्र काही वर्षे मनपाला उत्पन्न मिळणार नाही़ त्यामुळे यासंदर्भात नाशिक महापालिकेकडून मार्गदर्शन मागविले जाणार असून सोमवारी तसे पत्र पाठविणार असल्याची माहिती मनपा सूत्रांनी दिली़