उन्हापासून करा स्वत:चा बचाव

By admin | Published: March 30, 2017 03:07 PM2017-03-30T15:07:54+5:302017-03-30T15:07:54+5:30

मार्च महिन्यात जळगावकरांना मे हिटचा अनुभव येत आहे. उन्हाळ्यात काय काळजी घ्यावी. उन्हाचा शरीरावर काय परिणाम होतो ते तज्ज्ञांच्या शब्दात.

Protect yourself from the sun | उन्हापासून करा स्वत:चा बचाव

उन्हापासून करा स्वत:चा बचाव

Next

डॉक्टरांचा सल्ला : डोळे, त्वचाचे आजार बळावण्याची शक्यता, लहान मुले, गर्भवती महिलांची घ्या काळजी

जळगाव, दि.30- दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत असल्याने जून महिन्यार्पयत त्याचा अधिक त्रास होण्याची शक्यता आहे. त्यात दोन दिवस सतर्कतेचा इशारा दिल्याने अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. उन्हाळ्यात त्वचा, डोळ्य़ांचा त्रास तर वाढतोच सोबतच उष्माघाताची आणि त्यातून मृत्यूही ओढवण्याची शक्यता आहे. लहान मुले व गर्भवती स्त्रीयांची अधिक काळजी घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. 
लहान मुलांना बाहेर नेणे टाळा
लहान मुलांची काळजी घेण्याबाबत सांगताना बालरोग तज्ज्ञ डॉ. चंद्रशेखर सिकची म्हणाले की, बाहेर काही महत्त्वाचे काम असेल तरच लहान मुलांना न्या. अन्यथा त्यांना बाहेर पडू देऊ नका. उन्हामुळे लहान मुलांना डायरिया, टायफाईड प्रसंगी उष्माघात होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे लहान मुलांना यात्रा, लग्न सोहळ्य़ाच्या ठिकाणी नेऊ नये. विशेषत: लग्नाच्या ठिकाणचे बर्फाचे पाणी तसेच बर्फाचा गोळा, पाणीपुरीचे पाणी देऊ नये, यामुळे हे आजार अधिक बळावतात. घरी असो अथवा कोठेही असल्यास टरबूज देऊ नये, कारण त्याला पाणी पुरवठा गढूळ पाण्याचा असतो. त्यामुळे डायरियाची अधिक शक्यता असते. दुचाकीवरून तर मुलांना नेऊ नये. घर, कार्यालयात कुलर, एसी सुरू असताना एकदम घराबाहेर पडू नये. काळजी म्हणून लहान मुलांना सैल कपडे घालावे, शहाळे, लांब काकडी खायला द्यावी. उकळून थंड केले पाणी, ओआरएस अथवा, मीठ, साखरेचे मिश्रण असलेले पाणी आणि जुलाबाची औषधी प्रवासात सोबत ठेवावी, असा सल्ला डॉ.सिकची यांनी दिला. 
गर्भवती स्त्रीयांनी शारिरीक श्रमाची कामे करू नये
गर्भवती स्त्रीयांना सल्ला देताना स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. सुमन लोढा म्हणाल्या की, त्यांनी अधिक  शारिरीक श्रमाची कामे करू नये. सकाळी 11 ते संध्याकाळी सहा दरम्यान घराबाहेर पडू नये. जास्त बसणे, उठणे टाळावे, दगदग होणार नाही याची काळजी घ्यावी व वाळवणीची कामे करू नये. जास्त वेळ उभे न रहाता कामे करताना थोडा थोडा वेळ थांबून ती करावी. पाणी भरपूर प्यायला पाहिजे. शारिरीक तक्रार असल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. सहाव्या महिन्यानंतर गर्भाच्या हालचालीकडे लक्ष ठेवावे, असे डॉ. लोढा यांनी सांगितले. 
 
कशामुळे होतो त्रास?
आपण सगळेच उन्हात फिरतो. पण काही जणांचाच उन्हात गेल्यामुळे अचानक मृत्यू का होतो? याबाबत चर्चा केली जाते. आपल्या शरीराचं तापमान नेहमी 37 अंश सेल्सियस असत. या तापमानातच शरीरातील सर्व अवयव व्यवस्थित काम करू शकतात.  घामाच्या रूपाने पाणी बाहेर काढून शरीर 37 अंश सेल्सियस तापमान कायम राखत. सतत घाम निघत असताना पाण्याचे सेवन करीत राहाणे अत्यंत गरजेच आणि अत्यावश्यक आहे. पाणी शरीरात इतरही अधिक महत्त्वाची काम करते, त्यामुळे शरीरातील पाण्याचा साठा कमी झाला, तर शरीर घामाच्या रूपाने पाणी बाहेर टाकणे टाळते.  जेव्हा बाहेरचे तापमान 45 अंशाच्या पुढे जाते आणि शरीरातील ‘कूलिंग’ व्यवस्था पाण्याच्या अभावाने ठप्प होते, तेव्हा शरीराचं तापमान 37 अंशाच्या पुढे जाऊ लागते.  शरीराचे तापमान जेव्हा 42 अंश सेल्सियसर्पयत पोहोचते, तेव्हा रक्त तापू लागते आणि रक्तातील प्रोटीन अक्षरश: शिजू लागते, स्नायू कडक होऊ लागतात, त्यात श्वास घेण्यासाठी लागणारे स्नायूही निकामी होतात.  रक्तातील पाणी कमी झाल्यामुळे रक्त घट्ट होते.  रक्तदाब अत्यंत कमी होतो.  महत्त्वाच्या अवयवांना, विशेषत: मेंदूला रक्त पुरवठा थांबतो. त्यामुळे माणूस कोमात जातो आणि त्याचे एक-एक अवयव अवघ्या काही क्षणात बंद पडतात आणि त्याचा मृत्यू ओढावतो.
 उन्हाळ्यात असे अनर्थ टाळण्यासाठी सतत थोडे थोडे पाणी पित रहावे, व आपल्या शरीराचे तापमान 37 अंशच कसे राहिल याकडे लक्ष द्यावे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. 
 
काळजी संदर्भात काही टिप्स
- या दिवसात डोळे येण्याचे प्रमाण वाढेल, त्यामुळे डोळ्य़ाची विशेष काळजी घ्या. 
- गर्भवती स्त्रीयांनी अति श्रमाची कामे टाळावी. 
- ज्यांना ह्रदयविकाराचा तसेच डायबेटीजचा त्रास आहे, त्यांनी व्यवस्थित तपासणी करीत रहावे.
 - आहारामध्ये रसदार फळांचा वापर करावा तसेच मांसाहार टाळावा
-  उकळून थंड केलेले पाणी प्रवासात सोबत ठेवावे. 

Web Title: Protect yourself from the sun

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.