धुळ्यात वकील संघाच्या अध्यक्षांविरोधात खोटा गुन्हा दाखल केल्याने आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2019 07:11 PM2019-05-09T19:11:16+5:302019-05-09T19:11:45+5:30
२० मे पर्यंतची मुदत : पोलिसांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : खोटे गुन्हे दाखल करणारा आणि खोटे गुन्हे दाखल करुन घेणारे यांच्या विरोधात योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन मिळाल्यानंतर धुळे जिल्हा वकील संघाने पुकारलेले आंदोलन अखेर मागे घेण्यात आले़ २० मे पर्यंत कारवाई न झाल्यास पुन्हा आंदोलन पुकारले जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला़ वकील संघाचे अध्यक्ष अॅड़ दिलीप पाटील आणि अन्य वकीलांविरोधात खोटा गुन्हा दाखल केल्याने आंदोलन छेडण्यात आले़
कायद्यातील तरतुदींचा दुरुपयोग करुन काही ठराविक वकीलांविरोधात खोटा गुन्हा दाखल करणाºया अनिल गंजीधर पवार यास हद्दपार करावे तसेच गुन्हा नोंदवून घेणारे शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक गणेश चौधरी यांना निलंबित करावे, अशी मागणी करीत धुळे वकील संघाच्यावतीने न्यायालय आवाराच्या बाहेर रास्तारोको आंदोलन करण्यात आले़ यावेळी धुळे जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अॅड़ दिलीप पाटील आणि सर्व पदाधिकारी आणि वकील उपस्थित होते़
याप्रसंगी वकील संघाने निषेध सभा देखील घेतली़ यानंतर वकील अधिकच आक्रमक झाले होते़ रास्ता रोको आंदोलनामुळे मालेगावकडून येणाºया आणि जाणाºया वाहनांचा मार्ग वळविण्यात आला होता़
वकील संघाचे निवेदन
पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की अनिल पवार हा जिल्हा परिषदेतील बडतर्फ कर्मचारी असून त्याने आजपर्यंत शहरातील अनेक लोकांविरुध्द धुळे न्यायालयात तसेच वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे नोंदविलेले आहेत़ पवार याने खोट्या तक्रारी करुन लोकांमध्ये भानगडी लावण्याचे उद्योग केले आहेत़ परिणामी शहरातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात येण्याची भीती आहे़
धुळे न्यायालयातील वकील संजय बाविस्कर हे २० एप्रिल रोजी न्यायालयीन कामकाज करीत असताना पवार याने त्यांना मारहाण केल्याने शहर पोलीस ठाण्यात पवार विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ यानंतर पवार याने उपोषणाची धमकी देवून वकील संघाचे अध्यक्ष अॅड़ दिलीप पाटील यांच्यासह अन्य वकीलांविरोधात मंगळवारी भादंवि कलम १४३, १४७, ३२३ अन्वये खोटा गुन्हा दाखल करण्यास पोलिसांना भाग पाडले़ ंविशेष म्हणजे गुन्हा दाखल करण्यापुर्वी पोलीस निरीक्षक गणेश चौधरी यांनी कुठलिही शहानिशा केली नाही़ कायद्याचा गैरवापर करुन पवार याच्याकडून लोकांना त्रास देणे सुरु असल्यामुळे अशा व्यक्तीला तातडीने जिल्ह्यातून हद्दपार करावे, तसेच संबंधित पोलीस अधिकाºयाविरोधात निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली़
पोलीस अधिकाºयांची भेट
वकीलांना रास्तारोको आंदोलन केल्यानंतर वातावरण अधिकच तणावपूर्ण झाले होते़ त्यामुळे अपर पोलीस अधीक्षक डॉ़ राजू भुजबळ, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील आंदोलनस्थळी दाखल झाले़ त्यांनी वकीलांचे म्हणणे ऐकून घेतल्यावर २० मे पर्यंत कारवाईचे आश्वासन दिले़ परिणामी सुरु असलेले आंदोलन तात्पुरता मागे घेण्यात आले़