अंगणवाडी सेविकांचे थाळीनाद आंदोलन; २६ हजार मानधनासह मोबाइलची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2023 07:54 PM2023-12-29T19:54:49+5:302023-12-29T19:55:17+5:30
संतोषी माता चौकातून सुरूवात झालेल्या मोर्चाचा जेल रोड, क्युमाईल क्लबसमोर समारोप झाला. त्यानंतर धरणे आंदोलन करण्यात आले.
अंगणवाडी सेविकांच्या कामाचा विचार करून त्यांना दरमहा २६ हजार व मदतनीसांना २२ हजार रूपये मानधन द्यावे. तसेच अंगणवाडी केंद्राच्या दैनंदिन कामकाजासाठी मोबाईल द्यावा, यासह विविध मागण्यांसाठी आज महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या नेतृत्वाखाली शहरातून महामोर्चा काढण्यात आला. त्यात अंगणवाडी सेविका व मदतनीस मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. संतोषी माता चौकातून सुरूवात झालेल्या मोर्चाचा जेल रोड, क्युमाईल क्लबसमोर समारोप झाला. त्यानंतर धरणे आंदोलन करण्यात आले.
अंगणवाडी कर्मचारी १९७५ पासून एबावीसे योजनेमध्ये पूर्णवेळ लहान बालक, किशोरवयीन मुली, गरोदर माता व स्तनदा माताची काळजी घेऊन, पुढची पिढी घडविण्याचे कर्तव्य बजावत आहेत. दिवसभर काम करुनही. अनेक व्यवसायाचा किमान वेतनापेक्षाही अत्यंत तुटपुंजे मानधन मिळत आहे. फेब्रुवारी २०२३ मध्ये शासनाने जी मानधन वाढ केली होती, ती अत्यंत कमी होती. कामाचा विचार करून अंगणवाडी सेविकांना दरमहा २६ हजार आणि अंगणवाडी मदतनीसांना २२ हजार रूपये देण्यात यावे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना त्यांच्या मानधनाच्या अर्ध्या मानधनाएवढी दरमहा पेंशन द्यावी यासह अनेक मागण्यांकरिता हे आंदोलन करण्यात आले.
मुख्यमंत्र्यांनी अंगणवाडी केंद्राच्या दैनंदिन कामकारीता ऑक्टोंबर महिन्यापर्यंत नविन मोबाईल देण्याचे मान्य केले होते, मात्र अद्यापपर्यंत मोबाईल दिले गेले नाही. केंद्र शासनाच्या आदेशानुसार, सर्व मिनी अंगणवाडी केंद्राचे नियमीत अंगणवाडी केंद्रात रुपांतर करावे. अतिदुर्गम तालुक्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता देण्यात यावा. एप्रिल २०१४ ते मे २०१७ पर्यंत बहुसंख्य अंगणवाडी कर्मचा-यांना अजूनही सेवानिवृत्तीचा लाभ मिळालेला नाही. तो लाभ १० टक्के व्याजासह देण्यात यावा, या मागण्यांसाठी आज धुळ्यात थाळीनाद आंदोलन करण्यात आले.