थापेबाज सरकारला जनता कंटाळली
By admin | Published: July 14, 2017 11:38 PM2017-07-14T23:38:17+5:302017-07-14T23:38:17+5:30
राष्ट्रवादीचा शेतकरी मेळावा : अजित पवार यांची टीका, शिवसेनेवरही चौफेर हल्ला
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : थापेबाज आणि केवळ घोषणा करणाºया केंद्र व राज्य सरकारला जनता कंटाळली आहे. शेती मालाला भाव नाही, जिवनावश्यक वस्तूचे भाव वाढत आहेत. सामान्य जनता महागाईने त्रस्त आहे. त्यामुळे सरकार विरोधी वातावरणाचा फायदा घेत सामान्य जनतेत राष्टÑवादी कार्यकर्त्यांनी मिसळावे, त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी पुढे यावे असे आवाहन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
राष्ट्रवादीचा कार्यकर्ता, शेतकरी मेळावा शुक्रवारी येथील शिवाजी नाट्यमंदिरात घेण्यात आला. यावेळी आमदार अजित पवार यांच्यासह पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार सुनील तटकरे, आमदार देवराव गायकवाड, महिला आघाडीच्या अध्यक्षा चित्रा वाघ, युवक आघाडीचे अध्यक्ष संग्राम कोते पाटील, विद्यार्थी आघाडीच्या स्मिता आर.पाटील, प्रमोद हिंदुराव, जिल्हा संपर्क नेते उमेश पाटील, शिवाजीराव पाटील, ईश्वर बाळगुडे, जिल्हाध्यक्ष राजेंद्रकुमार गावीत, माजी आमदार शरद गावीत, युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष सागर तांबोळी, महिला आघाडीच्या हेमलता शितोळे यांच्यासह विविध आघाडींचे प्रमुख, तालुकाध्यक्ष उपस्थित होते.
आमदार अजित पवार म्हणाले, भाजप सरकार गेल्या अडीच वर्षात सर्वच पातळींवर अपयशी ठरले आहे. जनतेत नैराश्य आले आहे. नोटाबंदीमुळे अनेक व्यवसाय व उद्योग ठप्प झाले आहेत. यामुळे काळा पैसा बाहेर येणार, बनावट नोटा बाहेर येणार असल्याचे सांगण्यात आले होते. कुठे आणि कोणता काळा पैसा बाहेर आला ते जाहीर करावे असे आवाहनदेखील त्यांनी केले.
सरकारच संभ्रमावस्थेत
कर्ज माफीस नकार देणाºया सरकारला कर्ज माफीचा निर्णय घेण्यास भाग पाडले. कुणाला किती कर्ज माफ झाले याची काहीही आकडेवारी नाही. याद्या जाहीर नाहीत. वेळोवेळी निर्णयात बदल केला जात असल्यामुळे बँकादेखील संभ्रमात सापडल्या आहेत. शरद पवार देशाचे कृषीमंत्री असताना देशात ७१ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी जाहीर करण्यात आली. छोट्यातल्या छोट्या घटकाला त्याचा लाभ मिळवून दिला. परंतु आताचे सरकार कर्जमाफी जाहीर करताना संपूर्णपणे गोंधळलेले आहे. नियोजनशुन्य कारभार सुरू आहे.
जिल्ह्यात राष्टÑवादीची ताकद मोठी होती. मध्यंतरी काही जण सोडून गेले, परंतु पक्षाचे एकनिष्ठ आणि विश्वासू कार्यकर्ते कायम सोबत राहिले. त्यामुळे पक्षाचे काहीही नुकसान झाले नाही. कार्यकर्त्यांनी पराभवामुळे खचून जाऊ नये, तर विजयाचा उन्मान वाढू देऊ नये असा सल्लादेखील त्यांनी दिला.
सेनेवर तोफ डागली
शिवसेनेचे मंत्रीमंडळात १२ मंत्री आहेत. ते सर्वचजण मंत्रीपदाचा, शासनाच्या सोयीसुविधेचा लाभ घेतात. दुसरीकडे मात्र शासनाने काही निर्णय घेतल्यास त्याला विरोध करतात. मंत्रीमंडळात निर्णय घेणारे तुम्हीच आणि विरोध करणारेही तुम्हीच त्यामुळे दुतोंडी भूमिका घेणाºया प्राण्याची उपमा दिली, जनतेच्या मनातील बोललो तर त्यांना ते झोंबले. बँकाबाहेर ढोल वाजविण्यापेक्षा सेनेच्या मंत्र्यांनी मंत्रालयात जाऊन मुख्यमंत्र्यांसमोर ढोल वाजवावे असा टोलादेखील अजित पवार यांनी लगावला. केवळ लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी हे सर्व प्रकार सुरू असल्याचेही ते म्हणाले.
मुंबई महापालिकेच्या ६० हजार कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. त्यापैकी निम्मे पैसा सरकारला व्याजाने दिला तरी शेतकरी कर्जमुक्तीचा प्रश्न सुटू शकतो. त्यामुळे सेनेला जर शेतकºयांचा खरच कळवळा असेल तर त्यांनी ते पैसे सरकारला द्यावे. कथनी आणि करणीत फरक ठेवू नये असेही आवाहन त्यांनी केले.
सध्याचे सरकार हे दुसºया पक्षाच्या नेत्यांची प्रतिमा मलीन करणे, त्यांची बदनामी करण्याचे काम करीत आहे. समाजासमोरचे महत्त्वाचे प्रश्न बाजुला ठेवून भलत्याच प्रश्नाकडे लक्ष वेधले जात आहे.
कार्यकर्त्यांना उद्देशून त्यांनी सांगितले, कार्यकर्त्यांनी निष्पक्षपणे राहिले पाहिजे. सर्व शाखा आणि आघाडींची स्थापना होऊन त्यांच्या कार्यकारिणी जाहीर झाल्या पाहिजे. त्यांच्यावर पदाधिकारी निवडताना तो निष्कलंक असला पाहिजे अशाही सूचना आमदार पवार यांनी दिल्या.
आदिवासींना राष्ट्रवादीनेच खरा न्याय दिला- तटकरे
प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितले, जिल्ह्यातील आदिवासी भागाला आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून खºया अर्थाने न्याय मिळाला. विविध योजना या भागापर्यंत पोहचविल्या.
आदिवासींना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला. परंतु सध्याचे सरकार हे आदिवासींचा द्वेष करणारे आहे. कुठलीही योजना राबविली जात नाही. योजनांचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहचत नसल्याची टिकादेखील त्यांनी केली.
जिल्हा परिषदेत पुन्हा राष्टÑवादीची सत्ता आणावयाची आहे. त्यादृष्टीने जिल्हा परिषद गट आणि गण स्तरावरदेखील काम झाले पाहिजे. प्रत्येक सेलच्या प्रमुखांनी महिन्याला बैठका घेऊन कामाचे नियोजन करावे असेही त्यांनी सांगितले.
प्रास्ताविकात जिल्हाध्यक्ष राजेंद्रकुमार गावीत यांनी जिल्ह्यातील पक्षाच्या कामकाजाची माहिती दिली. माजी आमदार शरद गावीत यांनी भाजप हा केवळ वापरून फेकून देणारा पक्ष असल्याचे सांगितले. पक्षात गेलेल्यांची काय गत झाली हे सर्वचजण पहात असल्याचेही त्यांनी सांगितले.
उमेश पाटील, चित्रा वाघ यांनीदेखील मनोगत व्यक्त केले.