धुळे तालुक्यात दह्याणे येथे बिबट्याचा हल्ल्यात पारडू ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 02:13 PM2017-12-26T14:13:45+5:302017-12-26T14:14:25+5:30
परिसरात भीतीचे वातावरण; बंदोबस्त करण्याची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : तालुक्यातील दह्याणे येथे बिबट्याच्या हल्ल्यात म्हशीचे पारडू ठार झाले. या घटनेने परिसरात भीती पसरली असून वन्यप्राण्यांच्या हल्ल्यापासून पाळीव प्राण्यांसह ग्रामस्थांचे रक्षण करावे, या मागणीने जोर धरला आहे.
तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याच्या हल्ल्यांचे प्रमाण वाढले असून शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रविवार २४ रोजी रात्री तालुक्यातील दह्याणे शिवारात विमलबाई वसंत पवार यांच्या शेतातील गोठ्यात बांधलेल्या म्हशीच्या पारडूवर बिबट्याने अचानक हल्ला करून त्याला ठार केले. दुसºया दिवशी म्हणजे सोमवारी सकाळी पवार शेतात गेल्यावर ही घटना त्यांच्या लक्षात आली.
घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे वनरक्षक डी.एस. भामरे आणि त्यांच्या सहका-यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.
या घटनेमुळे गावात आणि परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. सध्या रब्बी हंगामाची कामे गतीने सुरू असून त्या कामांसाठीही आता शेतकरी शेतात जाण्याचे टाळू लागले आहे. त्यामुळे वनविभागाने बिबट्याचा त्वरित बंदोबस्त करावा, जंगल क्षेत्रातून शेतात व गावात बिबट्या येणार नाही, यासाठीही वनविभागाने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी सरपंच अशोक राजपूत व ग्रामस्थांनी केली आहे.