ब्रिटीशांनी सुरू केलेली पंजाब मेल झाली १११ वर्षांची...

By सचिन देव | Published: May 31, 2023 06:29 PM2023-05-31T18:29:02+5:302023-05-31T18:29:43+5:30

१ जून १९१२ मध्ये झाली सेवेला सुरूवात : सीएसटी स्थानकावर उद्या केक कापून वाढदिवस साजरा करणार

punjab mail started by the british turns 111 years old | ब्रिटीशांनी सुरू केलेली पंजाब मेल झाली १११ वर्षांची...

ब्रिटीशांनी सुरू केलेली पंजाब मेल झाली १११ वर्षांची...

googlenewsNext

सचिन देव, लोकमत न्युज नेटवर्क, धुळे: 'झुक झुक झुक झुक अगीनगाडी, धुरांच्या रेघा हवेत काढी, पळती झाडे पाहुया, मामाच्या गावाला जाऊया'.., अशा प्रकारे ग. दि. माडगुळकर यांनी रेल्वे गाडीचे वर्णन केले असून, भारतातील सर्वात जुन्या ब्रिटीशांनी सुरू केलेल्या मुंबई-फिरोजपुर दरम्यान धावणाऱ्या पंजाब मेल ला आज १ जुन रोजी १११ वर्ष पूर्ण होत आहेत. १ जून १९१२ रोजी ब्रिटीशांनी ही गाडी सुरू केली होती. या सेवेला १११ वर्ष पूर्ण होत असल्याबद्दल मध्य रेल्वे प्रशासनातर्फे मुंबईतील सीएसटी स्थानकावर केक कापून गाडीचा वाढदिवस साजरा केला जाणार असल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

भारतामध्ये राज्य करण्यासाठी आलेल्या ब्रिटीशांनी १ जून १९१२ मध्ये पंजाब लिमिटेड या नावाने या रेल्वे सेवेला सुरूवात केली. सुरूवातीला मुंबई तील बल्लार्ड पियर येथून थेट पाकिस्तान मधील पेशावर दरम्यान ही गाडी धावत होती. समुद्रामार्गे जहाजाने भारतात येणाऱ्या ब्रिटीश अधिकाऱ्यांना व त्यांच्या परिवाराला या गाडीने लाहौर मार्गे पाकिस्तानातील पेशावर शहरात आणले जात होते. मुंबईहुन सुटल्यानंतर ही गाडी कल्याण, नाशिक रोड, मनमाड, चाळीसगाव, जळगाव, भुसावळ,बुरहानपुर,पुढे भोपाल मार्गे ही गाडी फिरोजपुर स्टेशनकडे रवाना होत होती. एकूण २ हजार ४९६ किलो मीटरचा प्रवास करत ही गाडी पेशावरला पोहचत होती .

स्वातंत्र्यानंतर फिरोजपुर पर्यंत सेवा..

स्वातंत्र्याच्या आधी ही गाडी मुंबईहुन सुटल्यानंतर पेशावर पर्यंत धावली. मात्र, भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर ही गाडी भारत-पाकिस्तान सीमा रेषेजवळील फिरोजपुर स्टेशन पर्यंतच धावत आहे. कोळशाच्या इंजिनवर चालविण्यात येणारी ही गाडी १९६४ पर्यंत कोळशावरच धावली. यानंतर काही वर्ष डिझेलचे इंजिन आणि आता इलेक्ट्रिक इंजिनवर या गाडीचा प्रवास सुरू आहे.

६ बोगींपासून सुरू झालेली गाडी, आता २४ बोगींवर..

ब्रिटीशांनी सुरूवात केलेल्या पंजाब मेल या गाडीला सुरूवातीला ६ बोगी होत्या. यातील तीन बोगी फक्त ब्रिटीश अधिकाऱ्यांसाठी होत्या, तर
उर्वरित तीन बोगी डाक सेवेसाठी होत्या. मात्र, आता कालांतराने यात वाढ होऊन, या गाडीच्या बोगींची संख्या २४ २४ पर्यंत आली आहे. तसेच १९३० पर्यंत या गाडीत फक्त ब्रिटीश अधिकाऱ्यानांच बसण्याची परवानगी होती. त्यानंतर कालांतराने इतर नागरिकांना गाडीमधुन प्रवास करण्याची परवानगी मिळाली. दरम्यान, सध्या ही गाडी मुंबईहुन दररोज सायंकाळी साडेसात वाजता पंजाबच्या दिशेने रवाना होते. सहा राज्यातुन १ हजार ९३३ किलो मीटरचा प्रवास करून तिसऱ्या दिवशी फिरोजपुर कैंट अर्थात पंजाब प्रांतात पोहचते. कोरोना काळ वगळता स्वातंत्र्यापासून आतापर्यंत या गाडीची सेवा अविरत सुरूच असल्याचे सांगण्यात आले.

भारतातील सर्वांत जुनी असलेली पंजाब मेल आज १११ वर्षे पूर्ण करत असल्याचा अभिमान आहे. कोरोना काळ वगळता आतापर्यंत निरंतर ही सेवा सुरू आहे. यानिमित्त केक  कापून गाडीचा वाढदिवस  साजरा केला जाणार आहे. - डॉ. शिवराज मानसपुरे, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे.

Web Title: punjab mail started by the british turns 111 years old

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.