कनिष्ठ अभियंतांसह पंटरला सुनावली शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2018 05:05 PM2018-12-16T17:05:56+5:302018-12-16T17:06:21+5:30
लाचखोरी प्रकरण : धुळे न्यायालयाचा निकाल
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : विद्युत रोहित्र बसविण्याची प्रक्रिया लवकर करण्यासाठी १० हजारांच्या लाचखोरी प्रकरणी वीज कंपनीचे कनिष्ठ अभियंता आणि त्याचा पंटर या दोघांना येथील न्यायालयाने शिक्षा व दंड ठोठावला आहे़ हा निकाल शनिवारी देण्यात आला़
शिंदखेडा तालुक्यातील पथारे येथील शेत गटात मंजूर झालेले विद्युत रोहित्र बसविण्याची प्रक्रिया लवकर करण्यासाठी दोंडाईचा येथील वीज कंपनीचे तत्कालीन कनिष्ठ अभियंता महेशकुमार मुलचंद वर्मा यांनी त्यांचा पंटर अर्थात खासगी इसम राकेश बापू कोळी (रा़ रामी, ता़ शिंदखेडा) याच्यामार्फत १० हजारांची लाच स्विकारली होती़ त्यामुळे याप्रकरणी दोघांविरुध्द लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे तत्कालिन उपअधीक्षक सोमनाथ तांबे यांनी तपासाअंती दोंडाईचा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला होता़ याप्रकरणी धुळे न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले होते़
याप्रकरणात सरकार पक्षातर्फे अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील पराग पाटील यांनी कामकाज पाहीले त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश भोरटेकर, न्यायालय कर्मचारी प्रकाश सोनार यांनी वेळोवेळी मदत केली़ खटल्याची सुनावणी न्यायाधीश डॉ़सृष्टी नीळकंठ यांच्या न्यायालयात सुरु होती़ दाखल करण्यात आलेले पुरावे आणि साक्षीदार तपासल्यानंतर तत्कालीन कनिष्ठ अभियंता महेशकुमार वर्मा याला ३ वर्ष शिक्षा व ४० हजाराचा दंड आणि दंड न भरल्यास ६ महिने सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली़ तर, त्याचा पंटर राकेश बापू कोळी याला १ वर्ष शिक्षा व १० हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास २ महिने सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली़