धुळे जिल्हयातील २१ गावांमध्ये शुध्द पाणीपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 09:20 PM2018-06-22T21:20:56+5:302018-06-22T21:21:49+5:30
जलवाहिन्यांची गळती रोखली : प्रशासानाने दिले ग्रा.पं. ला हिरवे कार्ड
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : जिल्हयातील २१ गावांमध्ये जलवाहिन्यांना लागलेली गळती रोखण्यात येवून या गावांना शुध्द पाणीपुरवठा सुरू झाल्यामुळे या गावांना जिल्हा परिषद प्रशासनातर्फे हिरवे कार्ड देण्यात आल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली आहे.
राज्य शासनाच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागातर्फे केलेल्या पाहणीत जिल्हयातील २१ गावांमध्ये दूषित पाणी व जलवाहिन्यांना गळती लागल्याचे चित्र दिसून आले होते. त्यापार्श्वभूमीवर संबंधित २१ गावातील ग्रामपंचयतींना नोटीसा व पिवळे कार्ड देण्यात आले होते. तसेच जलवाहिन्यांना लागलेली गळती तत्काळ रोखावी; असेदेखील सूचित करण्यात आले होते. ग्रामपंचायत स्तरावर यासंदर्भात तत्काळ कार्यवाही करण्यात आली तर हिरवे कार्ड देण्यात येईल असेदेखीत सूचित करण्यात आले होते. त्यानुसार जिल्हयातील संबंधित ग्रामपंचायतींनी तत्काळ कार्यवाही करत जलवाहिन्यांची लागलेली गळती रोखली. तसेच ग्रामीण पाणीपुरवठा विभाग व आरोग्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने या गावांमध्ये शुद्ध पाण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्यामुळे २१ गावांना आता शुद्ध पाणी पुरवठा होत असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली आहे.
या गावांना दिले प्रशासनाने हिरवे कार्ड
धुळे : नवलाणे, देउळ खुर्द, बांभुर्ले, शिरडाणे प्र. ने, खंडलाय बुद्रूक
साक्री : बसरावळ, बोपखेल, कुडाशी, मळगाव, सुकापूर, शेवगे, विरखेल, कासारे, तामसवाडी, मालनगाव, घोडदे
शिंदखेडा : सोनेवाडी, वरपाडा, सुकवद
शिरपूर : उंटावद व सावळदे