मारण्याच्या उद्देशाने पतीने मला व मुलीस पेटवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2018 01:24 PM2018-05-09T13:24:52+5:302018-05-09T13:24:52+5:30
पत्नी सरिता खैरनार हीचा जबाब : अमळनेरच्या घटनेतील जखमी दोघांवर धुळ्यात उपचार
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : अमळनेर येथील घटनेत गंभीररीत्या भाजलेल्या सरिता खैरनार (३२) व त्यांची मुलगी तनुजा (५) यांच्यावर येथील खाजगी दवाखान्यात उपचार करण्यात येत आहेत. येथील शहर पोलिसांनी सरिता खैरनार यांचा जबाब घेतला. त्यात पती अनिल खैरनार याने आम्हाला मारण्याच्या उद्देशाने माझ्या व मुलीच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिले. तत्पूर्वी माझ्या गळ्यावर चाकूने वार केले, असे सांगितले.
अमळनेर येथील प्रताप मिल कम्पाऊंडमधील रहिवासी निवृत्त सैनिक अनिल खैरनार याने बुधवारी पहाटे पत्नी व मुलीस पेट्रोल टाकून पेटवून दिल्याने त्यात पत्नी सरिता (३२) व मुलगी तनुजा (५) या दोघी भाजल्याने गंभीररीत्या जखमी झाल्या. त्यांच्यावर येथील जिल्हा रूग्णालयात प्राथमिक उपचार करून साक्रीरोडवरील सेवा या खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात येत आहेत. शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप गांगुर्डे यांनी सकाळी
अनिल खैरनार सैन्यात होते. सहा महिन्यांपूर्वी ते निवृत्त झाले. त्यावेळी मिळालेल्या पैशांतून त्यांने घराचे बांधकाम केले. यात सर्व पैसे संपल्याने ते तणावात आले. त्यामुळे त्यांनी आत्महत्येचा निर्णय घेतला होता, असे त्यांच्या बोलण्यातून जाणवायचे. मी मेल्यानंतर तुमचे कसे होईल, असे ते म्हणत. बुधवारी रात्री अनिल मुलगा करणसह कॉटवर तर पत्नी सरिता मुलगी तनुजासह खाली झोपली होती.
पहाटे साडेचार वाजता अनिल खैरनार यांनी चाकूने पत्नीच्या गळ्यावर वार केला. तसेच त्यांच्या अंगावर तसेच कॉटवर पेट्रोल ओतून लाईटरच्या सहाय्याने पेटवून दिले. सरिताने दार उघडून बाहेर पळाली. तिने बाहेर मातीत लोळून स्वत:ला विझविण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर अनिलने तेथून पळ काढला. घरात मुलगी तनुजा ८५ ते ९० टक्के भाजली. अनिलने रेल्वे मार्गावर जाऊन मालगाडी स्वत:ला झोकून देत आत्महत्या केली.
जखमी सरिता खैरनार व मुलगी तनुजा यांना तातडीने येथील जिल्हा रूग्णालयात आणण्यात आले. त्यांच्यावर उपचार करून पुढील उपचारासाठी खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू असून दोघांची प्र्रकृती गंभीर असल्याची माहिती या दावाखान्याच्या डॉक्टरांनी दिली.
कुटुंबीय अनभिज्ञ
मयत अनिल खैरनार हे दोन वर्षांपूर्वी सैन्यातून सेवानिवृत्त झाले. ते १० वर्षांपासून अमळनेरला राहत होते. दुसाने येथे त्यांचे वडील लोटन हरी खैरनार, आई बेबाबाई, लहान भाऊ रावसाहेब राहतात. लहान भावाचे लग्न झाले असून तो शेती करतो. मयत अनिलचे शिक्षण दुसाने येथे झाले आहे. तो शांत स्वभावाचा होता,असे त्यांच्या मित्रांचे म्हणणे आहे. दुसाने येथे अद्याप या दुदेर्वी घटनेची माहिती त्यांच्या घरी कळविले नसल्याने ते या घटनेपासून आतापर्यंत अनभिज्ञ असल्याचे आमच्या दुसाने येथील वार्ताहराने कळविले. मयत खैरनार यांचे आजोबा हरी खैरनार हे स्वातंत्र्यसैनिक होते. आजी सोजाबाई हरी खैरनार या हयात आहेत.