धुळ्यात दरोडा टाकण्यापुर्वीच शस्त्रांसह चौघे जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2018 05:25 PM2018-03-18T17:25:22+5:302018-03-18T17:25:22+5:30
मोहाडी पोलीस : फरार आरोपीचा शोध सुरु
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : मोहाडी पोलिसांच्या गस्ती पथकाने म्हाडा वस्तीजवळ कार आणि शस्त्रांस्त्रासह चौघा दरोडेखोरांना रविवारी पहाटेच जेरबंद केले़ एक जण मात्र अंधाराचा फायदा घेवून पळून जाण्यात यशस्वी ठरला़ दरोडेखोर जेरबंद झाले नसते तर मोठी दुर्घटना घडली असती, असा अंदाज व्यक्त होत आहे़
पोलिसांची रात्रीची गस्त
मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर म्हाडा वसाहत परिसरात मोहाडी पोलिसांची रात्रीची गस्त सुरु होती़ या वसाहतीजवळील पंचमुखी हनुमान मंदिराजवळ एक संशयास्पदरित्या कार आणि त्यात काही जण असल्याची गोपनीय माहिती मोहाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांना मिळाली़ माहिती मिळताच त्यांच्या नेतृत्वाखाली मोहाडी पोलिसांचे पथक पंचमुखी हनुमान मंदिराजवळ पोहचले़ कारजवळ आल्यानंतर प्राथमिक चौकशी करत असताना कारची तपासणीही करण्यात आली़ त्यात तलवार, लाकडी दांडा, सुती दोरी, मिरचीची पूड, लोखंडी रॉड, पाईप, लोखंडी पाना असे साहित्य आढळून आले़
चौघांना केली अटक
पोलिसांनी लागलीच कारमध्ये असलेले विरेंद्रसिंग रामकेवलसिंग ठाकूर (३५, रा़ पुरेजित ता़ हातगवा जि़ प्रतापगढ), गोकूळ लिंबाजी घाडगे (३२, रा़ गोरेगाव, मुंबई), संजय बाळू कामडी (२८, रा़ वसई जि़ पालघर), कैलास चिंतामण मोरे (२६, रा़ सोनगीर ता़ धुळे) या चौघा संशयितांना जेरबंद केले़ अंधाराचा फायदा घेवून एक संशयित मात्र पळून जाण्यात यशस्वी ठरला़
कारसह मुद्देमाल जप्त
पोलिसांनी एमएच ०४ एफए ५८३९ क्रमांकाची कार आणि दरोड्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य असे एकूण ५ लाख २२ हजार ४१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केलेला आहे़
पोलिसात गुन्ह्याची नोंद
मोहाडी पोलिसांनी रविवारी पहाटे साडेबारा वाजेच्या सुमारास ही कारवाई केली़ याप्रकरणी चौघांना जेरबंद करण्यात आले़ याप्रकरणी रविवारी पहाटे ४ वाजेच्या सुमारास हेड कॉन्स्टेबल भिकाजी रामचंद्र पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन चौघाही संशयित दरोडेखोरांविरुध्द गुन्हा नोंदविण्यात आला़ यातील एक जण फरार झाला असल्याने पोलीस त्याच्या मागावर आहेत़