धुळे जिल्ह्यातील दुष्काळ निवारणार्थ तिमाही आराखडा तयार - मुख्यमंत्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 02:20 PM2018-12-26T14:20:40+5:302018-12-26T14:22:04+5:30
टंचाई व दुष्काळाचे नियोजन, कायदा सुव्यवस्था वाढविणार
आॅनलाइन लोकमत
धुळे : जिल्ह्यातील जलस्त्रोतांमध्ये केवळ ३७ टक्के जलसाठा असून ४०५ गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण होऊ शकते़ टंचाई व दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर तिमाही आराखडे तयार करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धुळयात पत्रकार परिषदेत दिली़
येथील जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कायदा सुव्यवस्था व दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर बैठका घेतल्या़ यावेळी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ़ सुभाष भामरे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पर्यटन मंत्री जयकुमार रावल, पालकमंत्री दादा भूसे, खासदार डॉ़ हिना गावित, आमदार अमरिशभाई पटेल, डी़ एस़अहिरे, अनिल गोटे, कुणाल पाटील, काशिराम पावरा, विभागीय आयुक्त राजाराम माने, पोलीस महानिरीक्षक छेरिंग दोर्जे, जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांच्यासह अधिकारी उपस्थित होते़ बैठकांनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत भुमिका मांडली़
ते म्हणाले, जिल्ह्यातील ६७८ गावांमध्ये पैसेवारी कमी असून दुष्काळी परिस्थिती आहे़ तसेच जलस्त्रोतांमध्येही केवळ ३७ टक्के जलसाठा असून तो जुलैपर्यंत पुरविण्याचे आव्हान आहे़ त्यामुळे तिमाही आराखडे तयार केले आहेत़ चारा छावण्या, टँकर, जलयुक्त शिवार, सिंचन विहीरी, नरेगा, आॅनलाईन शिष्यवृत्ती, मुद्रा योजना, ग्रामसडक योजना यांसह विविध योजनांचा त्यांनी आढावा घेतला़ त्याचप्रमाणे शहरासाठी अक्कलपाडा योजना प्रस्तावित असून या योजनेसाठी १५ दिवसांत सर्वेक्षण करावे तसेच लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी निविदा प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना मजीप्राला दिल्याचे मुख्यमंत्री म्हणाले़
हद्दवाढीतील गावांसाठी निधी, पंतप्रधान आवास योजना, सुलवाडे-जामफळ योजनेचाही त्यांनी आढावा घेतला़ तसेच कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई कठोरपणे करण्याचे आदेश दिल्याचे मुख्यमंत्री म्हणाले़ दरम्यान, पोलीसांची बैठक सुरू असतांना आलेल्या आमदार अनिल गोटे यांनी, पैसे कसे खावे याचे प्रशिक्षण सुरू असल्याची टिका करून काढता पाय घेतला होता, मात्र नंतर त्यांनी महसूल अधिकाºयांच्या आढावा बैठकीस हजेरी लावली़