उत्पन्न वाढीसाठी रेल्वे प्रशासनाचा नवा फंडा; जामनेर, अकोला स्टेशनच्या मोकळ्या जागेत होणार ‘बॉक्स क्रिकेट’ची सुविधा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2023 09:42 PM2023-04-07T21:42:45+5:302023-04-07T21:43:16+5:30
यासाठी तीन जणांनी निविदा भरून बॉक्स क्रिकेटची सुविधा देण्याची तयारीही दर्शविली आहे. या सुविधेमुळे प्रवाशांचींही करमणूक होणार असून, रेल्वे प्रशासनालाही उत्पन्न मिळणार आहे.
धुळे : मध्य रेल्वेच्या भुसावळ रेल्वे प्रशासनाने वर्षानुवर्ष पडलेल्या मोकळ्या जागांचा उपयोग रेल्वेच्या उत्पन्न वाढीच्या दृष्टिकोनातून विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. यातील पहिल्या टप्प्यात जामनेर व अकोला स्टेशनच्या मोकळ्या जागेत ‘बॉक्स क्रिकेट’ (टर्फ पॉवर प्ले) ची सुविधा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी तीन जणांनी निविदा भरून बॉक्स क्रिकेटची सुविधा देण्याची तयारीही दर्शविली आहे. या सुविधेमुळे प्रवाशांचींही करमणूक होणार असून, रेल्वे प्रशासनालाही उत्पन्न मिळणार आहे.
‘बॉक्स क्रिकेट’ ही संकल्पना सध्या मोठ्या शहरांमध्येच दिसून येते. यात कमी जागेत चारही बाजूंना जाळी लावून, आतमध्ये क्रिकेट खेळता येते. क्रिकेटचा सराव करण्यासाठी अनेक खेळाडू यामध्ये क्रिकेट खेळण्याला प्राधान्य देत असतात. त्या दृष्टिकोनातुन भुसावळ रेल्वे प्रशासनाने नवोदित खेळाडूंसाठी तसेच प्रवाशासांठी रेल्वेच्या मोकळ्या जागेत ‘बॉक्स क्रिकेट’ची सुविधा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी भुसावळ विभागातील जामनेर, अकोला व धुळे स्टेशनसाठी इच्छुकांकडून निविदा मागविण्यात आल्या होत्या. यामध्ये जामनेर येथे ‘बॉक्स क्रिकेट’ सुरू करण्यासाठी एका व्यक्तीने निविदा भरली असून, अकोल्यासाठी दोन जणांनी निविदा भरली आहे. तर धुळे स्टेशनसाठी कुणीही निविदा भरली नसल्याचे सांगण्यात आले.
मक्तेदाराला भाडेतत्त्वावर चालवायला देण्यात येणार... -
रेल्वेच्या मोकळ्या तयार करण्यात येणारे ‘बॉक्स क्रिकेट’ हे मक्तेदाराच्या माध्यमातून भाडेतत्त्वावर चालविण्यात येणार आहे. मक्तेदाराकडून वर्षाचे एकत्रित भाडे घेण्यात येणार असून, एका मक्तेदाराला पाच वर्षांसाठी हे चालवायला दिले जाणार आहे. दिवसा व रात्रीदेखील ‘बॉक्स क्रिकेट’ सुरू राहणार असून, ‘बॉक्स क्रिकेट’चे शुल्क संबंधित मक्तेदार हा तासाप्रमाणे आकारणार आहे. यामध्ये क्रिकेट खेळण्यासाठी लागणारे सर्व साहित्य, सुविधा मक्तेदाराकडून पुरविण्यात येणार आहेत.
धुळ्याला स्टेशनला प्रतिसाद नाही -
भुसावळ रेल्वे प्रशासनातर्फे सुरुवातीला धुळे रेल्वे स्टेशनवर रेल्वे म्युझियम सुरू करण्यासाठी दोन वेळा निविदा काढल्या. मात्र, तरीदेखील प्रतिसाद मिळाला नाही. तर आता ‘बॉक्स क्रिकेट’साठी देखील जामनेर, अकोलासोबत धुळे स्टेशनसाठी निविदा काढण्यात आली होती. यासाठी देखील प्रतिसाद मिळाला नसल्याचे सांगण्यात आले.
भुसावळ रेल्वे प्रशासनातर्फे जामनेर, अकोला व धुळे स्टेशन परिसरातील मोकळ्या जागेत ‘बॉक्स क्रिकेट’ सुरू करण्याबाबत निविदा काढण्यात आल्या होत्या. यामध्ये जामनेर व अकोल्यासाठी निविदेला प्रतिसाद मिळाला असून, धुळ्यासाठी प्रतिसाद मिळालेला नाही. या ‘बॉक्स क्रिकेट’मध्ये कुणालाही खेळता येणार असून, मध्य रेल्वेतील ही पहिलीच संकल्पना ठरणार आहे.
- डॉ. शिवराज मानसपुरे, विभागीय वरिष्ठ वाणिज्य प्रबंंधक, भुसावळ रेल्वे विभाग