नेर, देऊर परिसरात अर्धातास पाऊस; झाडे उन्मळून पडली
By अतुल जोशी | Published: May 22, 2023 07:08 PM2023-05-22T19:08:30+5:302023-05-22T19:09:37+5:30
काही शेतकऱ्यांचे कांदा, भूईमूग, भाजीपाल्याचे नुकसान झाल्याचे वृत्त आहे.
धुळे- गेल्या काही दिवसांपासून तीव्र उन्हामुळे अंगाची लाहीलाही होत असताना, सोमवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास धुळे तालुक्यातील नेर, देऊर,खंडलाय बुद्रक भागात अचानक वळवाच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. सुमारे अर्धातास झालेल्या दमदार पावसामुळे शेतांमध्ये पाणी साचले. वादळामुळे काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली. तर काही शेतकऱ्यांचे कांदा, भूईमूग, भाजीपाल्याचे नुकसान झाल्याचे वृत्त आहे.
एप्रिल महिन्यात वळवाच्या पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. तर मे महिन्याच्या सुरवातीपासूनच तीव्र उन्हामुळे अंगाची लाहीलाही होत होती. धुळे जिल्ह्यातही तापमानाने ४० अंशाचा आकडा पार केला होता. अशातच सोमवारी नेर व देऊर परिसरात दुपारी ढगाळ वातावरण तयार होत, चार वाजेच्या सुमारास जोरदार पावसाला सुरूवात झाली. वादळामुळे काही ठिकाणचे पत्रे उडाले. तर शेतातही पाणी साचले होते. तसेच खंडलाय बुद्रुक भागात वादळी वाऱ्यामुळे झाडे उन्मळून पडली. चाऱ्याचे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी विजेचे पोलही पडले आहेत. सुदैवाने कुठेही जीवित हानी झालेली नाही.